कर्नाटकमधील विधानसभेचं मतदान आज पार पडत आहे. राज्यातील 224 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान पार पडत असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शिंदे आणि फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे सरकारचा उल्लेख मिंधे सरकार असा करत संजय राऊतांनी महाराष्ट्रातील जनता शिंदे-फडणवीसांना माफ करणार नाही असं म्हटलं आहे.


मोदी-शाहांचा उल्लेख करत केली भविष्यवाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मतदानाला सुरुवात झाल्यानंतर तासाभरामध्ये संजय राऊत यांनी ट्वीटरवरुन आपली प्रतिक्रिया नोंदवली. यामध्ये राऊत यांनी कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होणार आहे असा दावा केला आहे. संजय राऊत यांनी हा दावा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही उल्लेख केला आहे. "आज कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे," असं विधान राऊत यांनी आपल्या ट्वीटच्या पहिल्याच वाक्यात केलं आहे. तसेच पुढील वाक्यात राऊत यांनी, "हा (भाजपाचा पराभव) 2024 साठी शुभ शकुन आहे," असंही म्हटलं आहे.


राज्य सरकारला केलं लक्ष्य


मोदी आणि शाह यांच्याबरोबरच राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील सरकारलाही लक्ष्य केलं आहे. शिंदे सरकारने सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आरोप केले आहेत. "दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली," असं राऊत ट्वीटमध्ये म्हणाले आहेत. तसेच, मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधताना, "स्वतःला शिवसेना म्हवणून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली," असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, "महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे. मराठी माणूस हे लक्षात ठेवील," असंही राऊत यांनी म्हटलं आहे.



शिंदे-फडणवीसांचा कर्नाटकात प्रचार


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. निपाणीमधील सभेतून फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर निशाणा साधला होता. मतांचे विभाजन व्हावे म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सहकार्याने जाणूनबुजून निपाणीमध्ये उमेदवार दिला असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादीचं पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, आम्ही काय ते पाहून घेऊ असं म्हणताना राष्ट्रवादीचा उल्लेख 'महाराष्ट्रातील साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष' असा केला होता.