कर्नाटक सरकारच्या `त्या` निर्णयावरुन फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले, `सत्तेसाठी तुम्ही...`
Devendra Fadnavis Slams Uddhav Thackeray: कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर एका महिन्याहून कमी कालावधी झालेल्या सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या निर्णयावरुन फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
Karnataka Govt Removes Chapters on RSS Founder Savarkar: कर्नाटकमध्ये सत्तेत येऊन एका महिन्याहून कमी कालावधी झालेला असतानाच काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेले निर्णय रद्द करण्यास सुरुवात केली आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये भाजपाने लागू केलेला धर्मांतरण विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील धडे पाठ्यपुस्तकातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावरुन नवीन वाद सुरु झालेला असतानाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत त्यांना एक सवाल विचारला आहे.
फडणवीसांचा महाविकासआघाडीला टोला
मुंबईमधील गोरेगाव येथील एका कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक सरकार घेतलेल्या निर्णयावरुन निशाणा साधला. "एखादा धडा तुम्ही वगळू शकता पण लोकांच्या मनातून तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर काढू शकत नाही, हेडगेवार काढू शकत नाही. एकही स्वातंत्र्यसेनानी हा लोकांच्या मनातून काढू शकत नाही. काँग्रेस सरकार आल्यानंतर वेगळं काहीच अपेक्षित नाही. केवळ अल्पसंख्यांकांचं लांगूलचालन करण्यासाठी अशाप्रकारचे निर्णय कर्नाटकचं सरकार घेत आहे. माझा महाविकास आघाडी सरकारला सवाल आहे तुम्ही जे सांगताय महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न आणणार तो हाच पॅटर्न आहे का?" असा प्रश्न फडणवीस यांनी राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या महाविकासआघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला विचारला आहे.
उद्धव ठाकरेंना सवाल
तसेच फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेख करुन कर्नाटकमधील या धडा वगळण्याच्या प्रकरणावरुन टोला लगावला. "माझा एक प्रश्न उद्धव ठाकरेजींना आहे. आता तुमची प्रतिक्रिया काय आहे? ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात ते जर आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव पुसायला निघालेले आहेत, धर्मांतरणाला पूर्णपणे समर्थन द्यायला निघाले आहेत तर आता तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे. सत्तेसाठी तुम्ही समजोता केला हे यातून अतिशय स्पष्ट होत आहे. हे असे निर्णय घेतल्याने ते कोणाचंही नाव जनतेच्या मानसपटलावरुन पुसू शकणार नाही," असं फडणवीस म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने भाजपाच्या कार्यकाळात पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश केलेला हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि उजव्या विचारसणीचे लेखक चक्रवर्ती सोलिबेले यांनी लिहिलेला धडा वगण्याचा आश्वासन दिलं होतं. त्यानुसार शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधु बंगप्रप्पा यांनी भाजपाच्या कार्यकाळात पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करण्यात आलेले धडे वगळण्याचं आम्ही जाहीरनाम्यातच सांगितलं होतं अशी आठवण करुन देत हे धडे वगळले जातील असं म्हटलं आहे. तसेच या धड्याऐवजी पंडित जवाहरलाल नेहरु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील धड्यांचा पाठ्यपुस्तकात समावेश केला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.