Pune By Election : `आमची मतं हवीत, आमचा उमेदवार नको`...ब्राम्हण समाज नोटाला मतदान करणार?
कसबा पोट निवडणुकीत हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने ब्राम्हण समाज नाराज, शैलेश टिळक यांच्या भेटीनंतर केला निर्धार
Pune By Election : आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पोट निवडणुकीत (Kasba By Election) आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) किंवा मुलगा कुणाल टिळक यांना उमेदवारी देण्यात येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र भारतीय जनता पक्षाकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. रासने यांना उमेदवारी दिल्यानंतर कसबा मतदारसंघातील ब्राह्मण समाज नाराज झाला आहे. या पार्श्वभूमीवर ब्राम्हण समाजातील काही नागरिकांनी आज शैलेश टिळक यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.
भेटीनंतर ब्राम्हण समाजाने आपली नाराजी व्यक्त करत कसबा पोट निवडणुकीत एकतर नोटाला मतदान करू किंवा आम्ही आमचा उमेदवार जाहीर करून अशी भूमिका घेतली. यामुळे पुण्यात पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून हेमंत रासन यांना उमेदवारी
कसबा पोट निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कडून हेमंत रासने यांनी शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडी कडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज दुपारच्या सुमारास आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील ब्राह्मण समाजाच्या काही नागरिकांनी शैलेश टिळक यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी आपली नाराजी जाहीर केली.
'आमची मतं हवीत, आमचा उमेदवार नको'
आजाराची झुंज देताना देखील आमदार मुक्ता टिळक यांनी आपल्या पक्षासाठी योगदान दिलं. मात्र पक्षाकडून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे. ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराला डावलून भाजपकडून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आल्याची भावना ब्राम्हण समाजाची आहे. आमचं पक्षाला प्रश्न आहे की आमच्या समाजातील एक गठ्ठा मत तुम्हाला हवा आहे पण आमचा उमेदवार नको आहे याचं स्पष्टीकरण भारतीय जनता पक्षाने आम्हाला द्यावं असं यावेळी ब्राह्मण समाजाच्या नागरिकांनी म्हटल आहे.
माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यापासून त्यांनी हा पायंडा सुरू केलेला आहे. आत्ता हा पक्षच बदलाय की काय अस प्रश्न आम्हाला निर्माण झालं आहे. आज आमचा समाज हा नाराज असून आम्ही या निवडणुकीतच आमची नाराजगी दाखवणार आहोत. एक तर आम्ही नोटा ला मतदान करू किंवा आम्ही आमचा उमेदवार उभ करू असा इशाराच ब्राम्हण समाजाने दिला आहे.
मी नाराज नाही - शैलेश टिळक
दरम्यान, 'उमेदवारीची अपेक्षा होती, पण मी नाराज नाही' अशी प्रतिक्रिया शैलेश टिळक यांनी व्यक्त केलीय. भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक उमेदवारी न मिळाल्यानं नाराज असल्याची चर्चा होती. हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरताना काढलेल्या पदयात्रेमध्ये टिळक कुटुंबीय सहभागी झाले नव्हते. मात्र टिळकांनी नाराजीचा इन्कार केलाय. यापुढं पक्ष सांगेल ते काम करणार, असं सांगतानाच 'ब्राह्मण समाज भाजपलाच मतदान करेल' असं ते म्हणाले..