वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार, केडीएमसीमधील सत्ताधाऱ्यांचा अजब शोध
कल्याण-डोंबिवलीकर सत्ताधाऱ्यांवर नाराज
कल्याण : कल्याण-डोंबिवलीत होणाऱ्या वाहतूक कोंडीला रेल्वे जबाबदार असल्याचा अजब शोध सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांनी लावला आहे. आज झालेल्या महासभेत याची प्रचिती आली. पत्रीपूलाचं काम रखडल्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते आहे. त्यातच आता २८ तारखेपासून कोपरचा पूलही बंद करण्यात येणार आहे. याचा फटका आगामी निवडणुकीत बसू शकतो, हे हेरून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांनी रेल्वेमुळेच या पुलांची कामं रखडल्याची ओरड सुरु केली आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी वाहतूक पोलीस यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
कल्याण-डोंबिवलीमधून राज्यात दोन मंत्री, दोन खासदार, चार आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षांचे आहेत. शिवाय कल्याण-डोंबिवली महापालिकेवर ही सत्ता शिवसेना-भाजपचीच आहे. असं असतानाही वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यात यश आलेलं नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपची सत्ता कल्याण डोंबिवली महापालिकेवर आहे.
वाहतुकीशिवाय इतर अनेक समस्या सोडवण्यात देखील कडोंमपा अपयशी ठरली आहे. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आगामी विधानसभा आणि त्यानंतर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो.