मुंबई : सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यानच बुधवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी अनेक राजकीय नेत्यांची ये-जा वाढली होती. शिवसेनेच्या संजय राऊत यांनीसुद्धा पवारांची भेट घेतली. ज्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही शिवसेना- भाजपचं सरकार स्थापन होण्याची वाट पाहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सत्तास्थापनेचं कसब पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हणत पवारांनी कोपरखळीही मारली. 


भाजपला ज्या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा सिद्ध करण्यात अडचणी आल्या आहेत तेव्हा तेव्हा सत्तास्थापनेसाठी शाह यांची राजकीय खेळी भाजपसाठी तारणहार ठरली आहे. ते याच कौशल्यांसाठी ओळखलेही जातात. त्यामुळे आपणही (महाराष्ट्राच्या राजकारणात) त्यांचं हे कसब पाहण्यासाठी उत्सुकता असल्याचं पवार म्हणाले. 



भाजपा अध्यक्ष अमित शाह अद्यापगी सत्तासंघर्षाच्या काळात राज्यात आलेले नाहीत याबद्दल प्रश्न विचारला असता पवारांनी हा टोला मारला. शाह हे ट्रबलशूटर आहेत. याआधी काही राज्यात सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी भेट दिली. मात्र आता ते इथे आले नाहीत असाही टोला त्यांनी लगावला. तेव्हा आता पवारांचा हा टोला पाहता अमित शाह कोणती राजकीय चाल चालणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.