Holi 2023: विड्याची अनोखी परंपरा...गाढव तयार पण, मिरवणुकीसाठी जावई सापडेनात...
Holi 2023: होलिका दहनानंतर धुळवड मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. सर्वत्र धुळवड अनोख्या पद्धतीने साजरी केली जाते. अशीच एक प्राचीन परंपरा बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात पाहायला मिळते. येथे जावयाची गाढवावरून गावभर मिरवणूक काढली जाते.
Holi Festival 2023: फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन (Holika Dahan) केले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड (Dhulvad) अर्थात रंगपंचमी साजरी केली जाते. होळीला विशेष धार्मिक महत्त्व आहे तर, रंगपंचमीच्या अनेक पारंपरिक आणि गंमतीशीर परंपरा आहेत. अशीच एक परंपरा बीड (Beed) जिल्ह्यातील केज (kaij) तालुक्यात पाहायला मिळते. रंगपंचमी म्हणजेच धूलिवंदनाच्या दिवशी गावच्या जावयांची गाढवावरुन मिरवणूक काढली जाते. यंदाही गाढव तयार आहे. पण, जावई सापडेनात, अशा परिस्थिती निर्माण झाली आहे. गावकरी जावयांचा शोध घेत आहेत (Holi Festival 2023).
केज तालुक्यातील विडा येथे धूलिवंदनाच्या दिवशी जावई बापूंची गाढवावरून मिरवणूक काढत रंगाची उधळण केली जाते. निझाम काळापासून सुरु असलेली ही परंपरा गावकऱ्यांनी आजही जपली आहे. यंदा देखील विड्याच्या गावकऱ्यांमध्ये या परंपरेचा जल्लोष पाहायला मिळत आहे. मात्र, गावात स्थायिक असलेले 200 जावई भूमिगत झाले आहेत. दडून बसलेल्या या जावयांचा गावकरी शोध घेत आहेत. त्यामुळे कोणत्या जावयांची गर्दभ सवारी निघणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
नेमकी काय आहे परंपरा
विडा या गावची लोकसंख्या अवघी सात हजारच्या आसपास आहे. गावाच्या वेशीजवळ दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. गावात साधू शिव रामपुरी महाराजांची संजीवन समाधी आहे. या गावाने मध्ययुगीन संस्कृतीचे दर्शन घडवणा-या लळीत नाट्याची परंपरा 100 वर्षांपासून जपली आहे.
कशी सुरु झाली गाढवावरुन जावयाची मिरवणुक काढण्याची परंपरा
निझाम काळात या गावाला जहागिरी होती. जहागीरदार तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख यांचे चिंचोली (बु, जि.लातूर) येथील मेव्हणे धूलिवंदनाच्या दिवशी सासुरवाडीत आले होते. त्यावेळी परंपरेप्रमाणे भांग पिऊन थट्टामस्करी सुरू झाली. मस्करीतून जावयाची गाढवावर बसून सवारी काढली गेली. तेव्हापासूनच येथे गाढवावरुन जावयाची मिरवणुक काढण्याची परंपरा सुरू झाली.
पंरपरा आजही कायम
गावात या पंरपरेला विशेष महत्व आहे. आधीपासूनच याची तयारी केली जाते. यासाठी गावातील तरुण मंडळींची एक जावई शोध समिती तयार केली जाते. ही समिती एक जावई शोधून आणते. याचीच धूलिवंदनाच्या दिवशी मिरवणुक काढली जाते. यामुळे मिरवणुकीच्या आधी हा जावई पळून जाऊ नये यासाठी आधीच त्याला ताब्यात घेवून एका ठिकाणी ठेवले जाते. यानंतर धूलिवंदनाच्या दिवशी त्याला चपलेचा हार घालून गावच्या वेशीपर्यंत गाढवावरुन मिरवणूक काढली जात रंगाची उधळण केली जाते. यानंतर जावयाला नवा पोशाख दिला जातो. तसेच सासरे या जावयाला सोन्याची अंगठी भेट म्हणून देतात. विशेष म्हणजे या मिरवणुकीत सामजिक एकोपा पहायला मिळतो. यात सर्वधर्मीय सहभागी होतात. अगदी मुस्लीम समाजाच्या जावयाला देखील या मिरवणुकीचा मान मिळाला होता.