खेड : रत्नागिरीच्या खेड पिरलोटे इथे पोलीस मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण आणि वाहन जाळपोळप्रकरणी तीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी २५ जणांची नावे समोर आली असून खेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयास्पद गाडीतून गाई आणि बैलांना कत्तलीसाठी नेले जात असल्याने रत्नागिरीतील पीरलोटे धामणदेवी परिसरात शनिवारी पहाटे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत पोलिसांना माहिती देऊनही कारवाई होत नसल्याने संतप्त जमावाने पहाटे एक संशयास्पद गाडी मुंबई-गोवा महामार्गावर अडवली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाडीतील माणसांनी जमावाला हत्यारांचा धाक दाखवल्याने जमाव आणखीच संतप्त झाला. चिडलेल्या जमावाने रास्ता रोको करत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक अडवून धरली. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला. या लाठीमारामुळं संतापलेल्या जमावानं पोलिसांवर हल्ला करत, पोलिसांची गाडीच पेटवून दिली. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.



प्राण्यांची हत्या केल्याप्रकरणावरून खेडच्या पिरलोटे भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आणि त्यांनी तब्बल चार तास मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. महामार्गावर टायर जाळून महामार्ग दोन्ही बाजूची वाहतूक ग्रामस्थांनी रोखून धरली होती. या परिसरात प्रण्यांच्या हत्येनंतर पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे आज पहाटे पासूनच जमावाने मुंबई-गोवा महामार्ग रोखला. त्यानंतर पोलीस आणि तहसीलदार आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी घटनास्थळी आले. मात्र त्याचवेळी पोलिसांनी लाठीमार सुरू केल्यावर हजारोंच्या संख्येने जमलेल्या जमावाने पोलिसांवर हल्ला करत पोलिसांची गाडी पेटवून दिली. त्यामुळे परीसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पहाटेपासून रस्त्यावर असलेला जमाव अखेर 4 तासानंतर शांत झाला. त्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.


गेल्या काही दिवसांतल्या या परिसरातल्या प्राणी कत्तलीच्या घटनांबाबतच्या तक्रारी स्थानिक पोलिसांना देण्यात आल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांनी संवेदनशीलता दाखवली असती तर कदाचित लोकांचा उद्रेक थांबवता आला असता. उलट प्राणी हत्येमुळे आंदोलन केलेले स्थानिकच आता आरोपी झालेत, तर मुळ आरोपी मोकाट आहेत असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत.