अमर काणे, झी मीडिया, नागपूर : येथे एका मुख्याध्यापकाचे अपहरण करून 30 लाखांची खंडणी मागण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी वेगाने पावले उचलत एका शिक्षिकेच्या पतीसह दोघांना अटक केली आहे तर दोन आरोपी फरार आहेत. नोएल उर्फ सनू फ्रान्सिस व सूरज फाळके असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्रदीप मोतीरमानी असे सुटका झालेल्या मुख्याध्यपकाचे नाव आहे. तर जॉय आणि विकी हे दोन आरोपी फरार आहेत. प्रदीप मोतीरमानी आणि हे जरीपटक्यातील महात्मा गांधी हिंदी हायस्कूलचे मुख्याध्यापक आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शाळेत रीना नावाची शिक्षिका आहे.आरोपी नोएल रिनाचा पती आहे. तोही प्रदीप यांना ओळखतो. नोएल व रिना यांच्यात घटस्फोट झाला होता. पैशांची चणचण असल्याने नोएलने प्रदीप यांच्या अपहरण आणि खंडणी मागण्याचा कट रचला. त्याकरता त्याने मित्र सुरज, जॉय व विकीलाही सोबत घेतले. 


प्रदीप शुक्रवारी रात्री औषध घेण्याकरता मानकापूर चौकात गेले असता नोएल तिथे आला त्याने प्रदीप यांच्याशी संवाद साधत गाडीत बसवले. तसेच प्रदीप यांना बोलण्यात गुंतवून ठेवत नोएलने त्यांना स्वतःच्या फ्लॅटवर नेले आणि तिथे नेल्यावर प्रदीप यांचे हातपाय बांधून एका खोलीत दाबून ठेवले. 


दरम्यान प्रदीप यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. दरम्यान प्रदीप यांच्या मुलीच्या मोबाईलवर नोएलने कॉल करत तुझ्या वडिलांना जिवंत बघायचे असेल तर तीस लाखाची खंडणी द्यावी लागेल अशी धमकी दिली.


प्रदीप यांच्या मुलीने पोलिसांना खंडणी बाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत प्रदीप यांचे कॉल डिटेल्स तपासले आणि त्या आधारे तपास करत दोन आरोपींना गजाआड केले. अशा प्रकारे अपहरण झालेल्या प्राध्यापकाची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.