रत्नागिरी : कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे कोकणातील आंबा फळबागायतदार चिंतेत असताना एक दिलासा देणारी बातमी आहे. पोस्ट खात्याच्या मदतीने फळांचा राजा मुंबईत दाखल झाला आहे. कोकणातून तब्बल तीन टन आंबे रवाना करण्यात आले आहे. इतर वाहतुकीपेक्षा पोस्ट खात्याच्यावतीने स्वस्त दराने ही वाहतूक असल्याने संकट काळात आंबा बागायतदारांना सुखद धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना शहरातून थेट गाव्याच्या वेशीपर्यत आला. याचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थकारणावर होऊ लागले. कोरोना आला आणि कोकणचा राजा अर्थात हापूस अंब्यावर देखील त्याचा परिणाम दिसून आला. बाजारात आंबा जाईनासा झाला. याकरिता सध्या सरकारी पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जात आहेत. 


दरम्यान, याकरिता आता पोस्ट खात्याने देखील पुढाकार घेतला आहे. पोस्ट खात्यामुळे राजापूर येथील नाणार गावातून हापूसचा आंबा थेट मुंबईमध्ये रवाना झाला आहे. १५५ पेट्या अर्थात तीन टन माल यावेळी रवाना झाला आहे. यावेळी एका पेटीकरिता पोस्ट खात्याकडून वाहतूक खर्च म्हणून फक्त १५० रुपये आकारले गेले. आंबा वाहतुकीकरिता इतर वाहनांच्या तुलनेत ही किंमत देखील परवडणारी अशीच आहे.


 पुढील काळात देखील पोस्ट खात्याच्या मदतीने आंबा वाहतूक केली जाणार आहे. शेकडो पेट्या एकाच वेळी पोस्टाने मुंबईला रवाना होण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोनाच्या काळात पोस्ट खाते अत्यावश्यक सेवेत असल्याने त्याचाच फायदा आंबा व्यापाऱ्यांना होत आहे. आतापर्यंत शेकडो पेटी आंबा मुंबईला रवाना करण्यात आला आहे. यासाठी खासदार विनायक राऊत यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.