लातूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या मुलावर चाकूने हल्ला
रेणापूर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतलं आहे.
शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यातील लातूर ग्रामीण विधानसभेतील काँग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांच्या मुलावर रेणापूर तालुक्यातील भोकरंबा गावात चाकूने हल्ला करण्यात आला.. ज्यात आमदार भिसे यांचा २२ वर्षीय मुलगा विश्वजीत भिसे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या पोटावर चाकूने वार करण्यात आले आहेत. आमदार त्र्यंबक भिसे यांच्या मोठ्या भावाने जिल्हा परिषद शाळेतील अतिक्रमणाबाबत जनहितार्थ याचिका दाखल होती. त्याचा राग मनात धरून भोकरंबा येथील श्रीकिशन भिसे आणि त्यांच्या दोन मुलांनी हा हल्ला केल्याचा आरोप आमदार भिसे आणि त्यांच्या जखमी मुलाने केलं आहे.
आमदार त्र्यंबक भिसे यांच्या शेतात नांगरणी चालू असताना विश्वजित त्र्यंबक भिसेवर पूर्वनियोजित कट करून श्रीकिशन भिसे आणि त्यांच्या दोन मुलांनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप होत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विश्वजीत भिसे यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान या घटनेतील आरोपींनी जिल्हा परिषद शाळेची जमीन अतिक्रमण करून बळकावण्याच्या प्रयत्नाला विरोध केल्यामुळेच हा हल्ला केल्याचा आरोप होतो आहे.
पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आमदार भिसे यांनी केली आहे. तर रेणापूर पोलिसांनी याप्रकरणी ५ जणांना ताब्यात घेतलं असून रेणापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.