Kojagiri Pournima : हिराची हिरकणी झाली तीही कोजागिरीच्या रात्रीच...
Kojagiri Pournima : आज कोजागिरी पौर्णिमा, आपण चंद्राच्या शितल छायेत मसालेदार, केसरयुक्त दुधाची चव घेतो. पण आज ऐतिहासिक घटना घडली होती.
Kojagiri Pournima : गोपनारी हिरकणी गडा गेली दूध घालाया परत झणी निघाली पायथ्याशी ते वसे तिचे गाव घरी जाया मन घेई पार धाव ||
शिवप्रभुंचा निर्बंध एक होता तोफ व्हावी अस्तास सूर्य जाता सर्व दरवाजे अचूक बंद व्हावे कुठे कोणा जाऊ न येऊ द्यावे ||
आज कोजागिरी पौर्णिमा म्हणजे उत्सव चांदण्या रात्रीचा...हाच तो दिवस कोजागिरीच्या साक्षीनं रायगडावर हिरकणीच्या धाडसी वृत्तीमुळे एक ऐतिहासिक घटना घडली. हिरकणीच्या धाडसाची आणि मातृप्रेमाची गोष्ट प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अधिराज्य करते. पण ही हिरकणी कोण होती, तिने काय धाडस केलं ज्यामुळे ऐतिहासिक घटना घडली. (kojagiri pournima hirkani raigad story )
गोष्ट हिरकणीची..!
सन 1674 साली शिवकाळातील ही घटना...रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावातून लोक गडावर वस्तू विकण्यासाठी येतं असतं. त्यात एक हिरा नावाची गवळण होती. आपल्या घरातील गाईंचं दूध घेऊन ती गडावर विकण्यासाठी जायची. या विक्रीतून ती कुटुंबाचं उदरनिर्वाह करायची. हिराचा हा दिनक्रम होता. पण या गडावर एक नियम होता. शिवाजी महाराजांच्या आज्ञानुसार गडाचे दरवाजे सकाळी उघडत असत आणि संध्याकाळी ते दरवाजे बंद होत असतं. गडाचे दरवाजे एकदा बंद झाल्यानंतर ते उघड नव्हते.
ती रात्र होती कोजागिरी पौर्णिमेची...हिरा ही ओली बाळंतीण होती. तिला गोंडस असा चिमुकला होता. नेहमी प्रमाणे ती सकाळी गडावर गेली. काम करता करता हिराला वेळचं भान राहिलं नाही. महाराजाच्या आज्ञांनुसार संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाले...
हिरा व्याकूळ होऊन धावत धावत गडाच्या महादरवाज्यावर पोहोचली, पण पहारेकऱ्यांनी गडाचे दरवाजे बंद केले होते.आता कुणाचीही गय केली जाणार नव्हती. हिराचा जीव तिच्या बाळासाठी कासावीस होऊ लागला तिने पहारेकऱ्यांना विनवणी केली. पण ते महाराजांच्या हुकमाचे बांधील होते.
आपलं बाळ भूकने रडत असेल या विचाराने हिराचा जीव कासावीस झाला होता. तिच्या डोळ्यासमोर तिचं रडणाऱ्या बाळाचा चेहरा येतं होता. घरी रडणाऱ्या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंहाचं बळ एकवटलं आणि तिने गड उतरणाचा निर्णय घेतला. जिवाचा धोका पत्करून एक 4400 फुटांचा रायगडावरील अत्यंत धोकादायक पश्चिमी बुरूज उतरण्याचा मातेचा धाडसी निर्णय...
रायगड कडेकपारी, जंगली श्वापद यांनी युक्त अवघड किल्ला होता. रात्रीच्या अंधारात उतरताना जर हात सुटला किंवा पाय घसरला तर मृत्यू ठरलेलाच...पण तिचा निश्चय पक्का होता...ती गडावरुन खाली जाण्याची वाट शोधत एका टोकापाशी आली. खरं त्या कडा दिवसाच्या प्रकाशात देखील उतरणे अशक्य होतं. पण तिने कसाही विचार केला नाही, तिने गड उतरण्यास सुरुवात केली...काटे टोचत होते, हातापायाला जखमा होतं होत्या. पण बाळाच्या प्रेमापुढे तिला ह्या वेदना जाणवत नव्हतं.
अखेरीस तिने कोजागिरीच्या चंद्राच्या साक्षीने त्या कड्यावरून सुखरुप खाली आली आणि धावत घर गाठलं. तिने बाळाला छातीशी कवटाळलं. त्यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली आणि शिवाजी महाराजांच्याही कानावर ही बातमी पडली.
महाराजांना हिराच्या धाडसाचं कौतुक वाटलं पण दुसरीकडे रागडाच्या सुरक्षिततेचीही काळजी वाटली. हिराला मानसन्मानासाठी गडावर बोलवण्यात आलं. तिला साडी चोळी देवून सत्कार करण्यात आला आणि त्या दिवशीपासून तिला हिराकणी नावानं ओळखलं जाऊ लागलं. शिवाय रायगडाच्या कडाला तटबंधी बांधून बुरुज बांधण्यात आला. त्या बुरुजास हिरकणीच्या पराक्रमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज हे नाव देण्यात आलं.
हा सन्मान होता तिच्या मातृत्वाचा आणि धैर्याचा...ती म्हणजे मातृत्वाचं आणि धाडसाचं प्रतीक...आज करिअर आणि मूल यांचा योग्य ताळमेळ साधत यशस्वी लाखो हिरकणी आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. कोजागिरी पौर्णिमानिमित्त त्या सर्व हिरकरण्यांना सलाम...