ठाणे : दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या परिसरात राहाणाऱ्या हजारो कोकणवासियांसाठी खुशखबर. कोकणात जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा, हे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलेय. तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना लवकरच थांबा देण्याची ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी खा. डॉ. शिंदे यांना दिलीये. नियमित धावणाऱ्या गाड्यांबरोबरच गणेशोत्सवात सोडणाऱ्या येणाऱ्या विशेष गाड्यांनाही दिवा स्थानकात थांब देण्याची तयारी श्री. प्रभू यांनी दर्शवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवा जंक्शन हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असून कल्याण, मुंबई, पनवेल आणि वसई अशा चार मार्गांना जोडणारे हे स्थानक आहे. मात्र, कोकण रेल्वेचे प्रवेशद्वार म्हणून दिव्याची ओळख असली तरी दिवसभरात दिवा-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या दोन पॅसेंजर वगळता लांब पल्ल्याची एकही गाडी दिवा स्थानकात थांबत नाही. 


दिवसभरात नेत्रावती, कोकणकन्या, मांडवी, मंगलोर, मत्स्यगंधा, जनशताब्दी आदी गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. मात्र, त्यांना दिवा येथे थांबा नसल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ या परिसरात मूळ कोकणवासीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून गावी जाताना गाडी पकडण्यासाठी त्यांना सामानसुमान आणि कुटुंबकबिला घेऊन ठाणे, लोकमान्य टिळक अथवा छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठावे लागते. 


त्यांची ही फरफट टाळण्यासाठी दिवा स्थानकात कोकण रेल्वेवरील महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी खा. डॉ. शिंदे गेली तीन वर्षे प्रयत्नशील होते.
बुधवारी त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन प्रवाशांची होणारी अडचण त्यांच्या निदर्शनास आणली. तसेच, गणेशोत्सवातही लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणांहून सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना दिवा स्थानकात थांबा मिळावा, यासाठी गेली तीन वर्षे प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी श्री. प्रभू यांच्या निदर्शनास आणून दिले.


त्यानंतर आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करून या गाड्यांना तसेच गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना दिवा स्थानकात थांबा देण्याची ग्वाही श्री. प्रभू यांनी दिली. त्यामुळे कोकणवासीयांसाठी लवकरच दिवा स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळणार आहे.