Dream 11 : कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. नशीब बदलावं म्हणून कोणी जीवापाड कष्ट करतं तर कोणी काही हुशारीने काम करुन यश मिळवतात. असाच काहीसा प्रकार कोल्हापुरात (Kolhapur) पाहायला मिळाला आहे. कोल्हापुरात एका सातवीत शिकणाऱ्या मुलाला चक्क एक कोटींची लॉटरी लागली आहे. कोल्हापुरच्या मुरगुड तालुक्यातील सातवीत शिकणारा मुलगा अवघ्या काही तासात कोट्यधीश झाला आहे. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात या मुलाने ड्रीम इलेव्हन (Dream 11) या ऑनलाइन खेळात भाग घेतला होता. मुलाला लागलेल्या या लॉटरीमुळे कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सक्षम बाजीराव कुंभार या सातवीत शिकणाऱ्या मुलाने भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) क्रिकेट सामन्यात ड्रीम इलेव्हन काही पैसे लावले होते. त्यानंतर त्याला तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागला. ड्रीम इलेव्हनवर सक्षमने तयार केलेल्या टीममुळे त्याला हा खेळ जिंकता आला. भारत- न्यूझीलंड सामन्यानंतर सक्षमने तब्बल एक कोटी जिंकल्याचे समोर येताच गावकऱ्यांनी बाईक रॅली काढत त्याची जंगी मिरवणूक काढली. या सामन्यातून सक्षमने एक कोटी जिंकल्यानंतर त्याच्या खात्यात 70 लाख रुपये जमा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. कराची रक्कम वजा करुन ही पैसे खात्यात जमा झाल्याचे म्हटले जात आहे.


सक्षमचे वडील बाजीराव कुंभार हे महावितरणमध्ये कर्मचारी आहेत. सक्षमचे क्रिकेटवर नितांत प्रेम आहे त्यामुळे तो कोणताही सामना चुकवत नाही. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याने सक्षमकडे मोबाईल आला होता. त्यावेळी त्याने ड्रीम इलेव्हनवर  अकाउंट सुरू केले आणि त्यावर टीम बनवून खेळण्यास सुरु केले. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी त्याने तयार केलेल्या टीमने सर्वात जास्त गुण मिळवले आणि त्याला एक कोटी रुपयांचे बक्षिस लागले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी त्याचावर कौतुकाचा वर्षाव केला. गावकऱ्यांनी सक्षमचा सत्कार करत बाईक रॅली काढण्यात आली.


ड्रीम इलेव्हन म्हणजे काय?


ड्रीम इलेव्हन या ऑनलाईन अॅपवर क्रिकेटचा सामना सुरू असताना व्हर्चुअल टीम तयार करून त्यावर काही पैसे लावले जातात. त्यानंतर सामना सुरू असताना तुम्ही तयार केलेल्या टीम मधील खेळाडूंना प्रत्यक्षात सुरू असलेल्या सामन्यातील खेळाडूने केलेल्या प्रदर्शनावरुन पॉइंट्स मिळतात.