प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : वनकर्मचारी असलेल्या व्यक्तीची मित्रानेच डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरातील (Kolhapur Crime) वारे वसाहत परिसरात घडली आहे. मृत वन कर्मचाऱ्याला त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय मित्रावर होता. त्यामुळे झालेल्या वादातून आरोपीने वनकर्मचाऱ्याचीच निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांनी  (Kolhapur Police) याप्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन कर्मचारी भास्कर शंकर कांबळे (वय वर्ष 50, रा. आणाजे, ता. राधानगरी) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर युवराज बळवंत कांबळे ( वय वर्ष 27 रा. कुडूत्री, ता. राधानगरी) असे संशियत आरोपीचे नाव आहे. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील वन कर्मचारी म्हणून काम करणारे भास्कर कांबळे आणि भाजीपाला विक्रेता असलेला युवराज कांबळे दोघात मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही सध्या आपल्या कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. दोघांची मैत्री घट्ट असल्याने परिवारात एकोपा निर्माण झाला होता. त्यामुळे दोघांचे ही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते.


मात्र गेल्या काही दिवसांपासून युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वनकर्मचारी भास्कर कांबळे यांना येत होता. याचाच राग त्यांच्याच डोक्यात होता. याच विषयावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होते. शेवटी हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी संध्याकाळी दोघेही संभाजी नगर येथील एका मित्राच्या घरात एकत्र आले होते. दोघांमधला वाद मिटला ही होता. मात्र वाद मिटवून घरी जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर हा वाद हाणामारी पर्यंत गेला. दोघात झटापट सुरू झाली. याच वेळी वनकर्मचारी भास्कर कांबळे खाली पडले. त्यावेळी युवराजने भास्कर कांबळे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर युवराजने स्वतः पोलीस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती पोलिसांना दिली.


मोक्का अंतर्गत अटकेत असलेल्या आरोपींनी केले विषप्राशन


इचलकरंजी येथील संघटित गुन्हेगारी अंतर्गत अटकेत असलेल्या कुख्यात टोळीतील दोघा आरोपींनी पोलीस कोठडीत विषारी औषध प्राशन केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती. जर्मनी गॅंग मधील या दोघांनी इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात आणि नंतर सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.