प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थानमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले आहे. बाळूमामा देवस्थान (Balumama Devasthan Trust) ट्रस्टमधील गैरकारभार आणि ट्रस्टमधल्या विश्वस्तांच्या नेमणुकीवरून मोठा वाद निर्माण झालाय. या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाल्याचे पाहायला मिळाले. कोल्हापूर शहरात झालेली ही फ्री स्टाईल हाणामारी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदमापुरचे सरपंच विजय गुरव हे बाळूमामा देवस्थान ट्रस्टमध्ये चुकीच्या पद्धतीने होणारी विश्वस्तांची नेमणूक आणि गैर कारभार यासंदर्भात वकिलांची भेट घेण्यासाठी कोल्हापुरात आले होते. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले यांचे समर्थक आणि सरपंच विजय गुरव यांच्यामध्ये जोरदार हाणामारी सुरु झाली. सरपंच विजय गुरव यांना मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले याच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. भोसले गटाच्या समर्थकांनी सरपंच गुरव हे गावचं आणि ट्रस्टचं नाव बदनाम करत असल्याचा आरोप करत मारहाण केली. 


तर दुसरीकडे सरपंच विजय गुरव यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. देवस्थान समितीच्या ट्रस्टचा कारभार चुकीच्या पद्धतीने करून बेकायदेशीर विश्वस्तांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर कार्याध्यक्षांची नेमणूक देखील बेकायदेशीर झाला आहे असा गंभीर विजय गुरव यांनी केला आहे. या मनमानी कारभाराविरोधात धर्मदाय आयुक्तांकडे देखील तक्रार केल्याचे सरपंच विजय गुरव यांनी म्हटलं आहे.


"बाळूमामाचे अवतार म्हणवून घेणाऱ्या मनोहर मामा भोसले  यांच्यावर झालेला कारवाईनंतर काही विघ्नसंतोषी आणि भ्रष्ट कारभार करणारे विश्वस्त आपल्यावर वारंवार अशा प्रकारचा हल्ला करत आहेत," असा आरोप आदमपूर सरपंच विजय गुरव यांनी केला आहे.