प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  सध्या लोक सोशल मीडियावर (Social Media) इतरांना ज्ञान देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. विविध कोट्स, म्हणी (aphorism) लिहून लोकांना कसं सुधरवता येईल याचा प्रयत्न या लोकांकडून होत असतो. आपल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्येही (WhatsApp) असे अनेक लोक असतात जे सकाळ संध्याकाळ सुविचार पाठवून पाठवून वात आणत असतात. काहींना वयाचा मान राखावा लागल्याने बोलता येत नाही. तर समवयस्कर असणाऱ्यांना एवढं ज्ञान कुठून आणता म्हणून सुनावता येतं. त्यामुळे सोशल मीडियावर असं ज्ञान पाजळणाऱ्यांपासून आपण सहसा कायमच लांब राहण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र असं ज्ञान देणारी लोकही खऱ्या आयुष्यात तसंच वागतात का हासुद्धा एक प्रश्न आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल कारण कोल्हापुरातल्या एका पठ्ठ्याने सोशल मिडीयावर माणूस खोटं बोलतो हे खरं करुन दाखवलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथं वाहन परत देण्यासाठी दहा हजाराची लाच मागणारा जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार सोमनाथ देवराम चळचूक याला लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडलं आहे. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली होती. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास सोमनाथ देवराम चळचूक याला लाच घेताना पकडले. या कारवाईमुळे आता जयसिंगपूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


वित्त संस्थेकडून व्हॅन वाहन परत देण्यासाठी सोमनाथ चळचूकने तक्रारदाराकडे दहा हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चळचूके याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.


नेमकं काय घडलं?


तक्रारदाराने वित्त संस्थेकडून कर्ज घेऊन व्हॅन घेतली होती. ती व्हॅन तक्रारदाराने ती शिरोळ येथील मित्राला विकली होती. मित्राने या वाहनावर असलेले हफ्ते भरले नाहीत. तर उलट ती व्हॅनच विकून टाकली. त्यामुळे तक्रारदाराने ती व्हॅन परत मिळावी यासाठी अर्ज केला होता. व्हॅन परत मिळवून देण्यासाठी चळचूकने पंधरा हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी गुरुवारी दहा हजारांची लाच घेताना चळचूक याला अटक केली आहे.


केवळ दहा हजार रुपयांसाठी लाच स्विकारणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्याची सध्या सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याचे कारण म्हणजे या लाचखोर पोलीस अधिकाऱ्याने यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. ती पोस्ट आता चांगलीच व्हायरल होत आहे. "84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो. पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही...?" असा सुविचार गेल्या वर्षी 28 डिसेंबर 2022 रोजी फेसबुकवर पोस्ट केला होता.



चळचूकने ही पोस्ट फेसबुकवर लिहीत भ्रष्टाचार करणाऱ्यांना एक प्रकारे सुनावलं होतं. पण आत्ता लाचखोर चळचुके यानेच लाच घेतल्याने लोका सांगे ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण या उक्तीचा प्रत्यय आलाय.