नवरा बायकोचा वाद सोडवला अन् घेतली दोन हजारांची लाच; महिला हवालदाराला पकडलं रंगेहाथ
Kolhapur Crime : पती-पत्नीच्या वादानंतर समुपदेशन केल्यानंतर समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला सहाय्यता कक्षातील महिला पोलीस हवालदाराला लाचलुचपत व प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कौटुंबिक वादाच्या तक्रार अर्जानंतर समुपदेशन करून वाद मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातील महिला हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकली आहे. काजल गणेश लोंढे वय 28, रा. पसरिचा नगर, सरनोबतवाडी, तालुका करवीर असे अटकेतील लाचखोर महिला हवालदाराचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षातच ही कारवाई करण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्य कक्षात काजल गणेश लोंढेंवर ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने महिन्यापूर्वी पत्नीच्या विरोधातील कौटुंबिक वादाचा अर्ज महिला सहाय्य कक्षात दिला होता. हवालदार काजल लोंढे हिने तक्रारदार पती आणि त्याच्या पत्नीस समोरासमोर बोलवून समुपदेशन केले. यानंतर तंटा मिटून ते दाम्पत्य एकत्रित राहू लागले. तंटा मिटल्याचे समजपत्र देण्यासाठी लोंढे हिने तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणी करून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर लोंढेंनी महिला सहाय्य कक्षात दोन हजारांची लाच स्विकारताच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तिला रंगेहाथ पकडले. पोलिस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांच्यासह प्रकाश भंडारे, अजय चव्हाण, विकास माने, सचिन पाटील, संगीता गावडे, पूनम पाटील यांनी ही कारवाई केली.
दरम्यान लाचखोर लोंढे हिच्या घराची ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली. मात्र, झडती दरम्यान विशेष काही हाती लागले नाही. काजल लोंढे 2014 पासून पोलीस दलात कार्यरत आहे. आठ महिन्यांपूर्वीच लोंढे या महिला सहाय्य कक्षात रुजू झाल्या होत्या. मात्र पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत असणार्या या कार्यालयातच ही कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधीच धक्कादायक प्रकार
शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महिनाभरातच हा दुसरा कोल्हापूर दौरा होत असून पेटाळा मैदान येथे संध्याकाळी 6 वाजता शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना आणि शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू असून भव्य मंडप देखील उभारण्यात आला आहे. मात्र त्याधीच पोलिस मुख्यालयाच्या इमारतीत लाच घेण्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.