...म्हणून मुंबई-पुण्यात दुधाचा तुटवडा
कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ६ फुटांहून अधिक पाणी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा दूध संकलानावरदेखील मोठा परिणाम झालाय. पुणे - बंगळुरू महामार्गावर पाणी आल्याने गोकुळ दूध संघानं दूध संकलनच बंद केलंय. त्यामुळे पुणे आणि मुंबईला दुधाचा पुरावठा होणार नाही. गोकुळ दूध संघाच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यात दररोज नऊ लाख लिटर दुधाचं संकलन केलं जातं. त्यापैंकी फक्त तीन लाख लिटर दुधाचं संकलन मंगळवारी करण्यात आलं होतं.
गोकुळ दूध संघ दररोज मुंबईला सात लाख लीटर दूध पाठवतं. मात्र मंगळवारपासून हे दूध मुंबई आणि पुण्याला गेलेलं नाही. एनएच-४ राष्ट्रीय महामार्गावरील पाणी ओसरलं नाही तर मुंबई-पुण्याला दुधाचा तुटवडा जाणवणार आहे.
भीषण पूरपरिस्थितीचा दूध संकलनावरही मोठा परिणाम झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र पुरेस दूध उपलब्ध आहे. तरी काही दुकानदार तुटवडा असल्याचं सांगत अतिरिक्त दराने दूध विक्री करत आहेत.
नवी मुंबईतही तीच परिस्थिती
नवी मुंबईत दररोज येणारे तेरा लाख लिटर दूध न आल्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत दुधाची टंचाई जाणवणार आहे. मंगळवारी रात्रीपासून या दोन जिल्ह्यातून एकही दुधाचा टँकर नवी मुंबईत आलेला नाही. कोल्हापूर वरून येणारे गोकुळ दुध सात ते आठ लाख लिटर, वारणाचे तीन ते चार लाख लिटर, सांगलीमधून येणारे चितळे, कृष्णा कंपन्याच्या दूध गाड्या नवी मुंबईत पोहोचल्या नाहीत. नवी मुंबईत दूध संकलन करून या ठिकाणावरून मुंबई, ठाणे, वसई, विरार, पनवेस या भागात दूध पुरवठा केला जातो. मात्र हा सगळा दूध पुरवठा गुरुवारी थांबणार आहे. त्यामुळे मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
कोल्हापुरात पंचगंगेला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर देखील ६ फुटांहून अधिक पाणी आहे. त्यामुळे पुणे - बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
दरम्यान, मुसळधार पाऊस आणि पंचगंगेची वाढत असलेली पाणी पातळी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजलेला दिसतोय. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट आहे. सध्या नदी ५४ फूट १० इंचावरून वाहतेय. पंचगंगेनं रौद्ररूप धारण केलंय. जिल्हा प्रशासनाच्या मागणीनंतर एनडीआरएफसह लष्कराची पथकं कोल्हापूरात दाखल झाली आहेत.