कोल्हापुरात पाणीपुरवठ्यामध्ये तब्बल 69 टक्के गळती
शहरातील पाणीपुरवठ्यात तब्बल 69 टक्के गळती लागलेय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ 15-20 टक्के गळतीचा दावा कऱण्यात आलाय.
कोल्हापूर : शहरातील पाणीपुरवठ्यात तब्बल 69 टक्के गळती लागलेय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ 15-20 टक्के गळतीचा दावा कऱण्यात आलाय.
औरंगाबाद, नागपुरात दूषित पाण्यानं थैमान घातलंय तर तिकडे कोल्हापुरात पाणीपुरवठ्यामध्ये तब्बल 69 टक्के गळती होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या एका कंपनीनं दिलेल्या अहवालात ही बाब उघड झालीय.
कोल्हापूरची लोकसंख्या जवळपास 6 लाख एवढी आहे. शहरासाठी महापालिकेकडून दररोज 198.21 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो... तरी देखील शहरातल्या अनेक भागात कमी दाबानं तर कुठे अपु-या पाण्याचा पुरवठा होतो.
पाईपलाईनला ठिकठिकाणी लागलेल्या गळतीमुळे ही परिस्थिती ओढावलीय. मात्र ही गळती केवळ 15 ते 20 टक्के असल्याचं पूर्वी कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी सांगत होते. मात्र, ही माहिती वस्तुस्थितीला अनुसरून नसल्याचं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीनं समोर आणलंय.
कोल्हापूर महापालिका प्रशासन दररोज 19 कोटी 80 लाख लिटर्स पाण्याचा उपसा करते. त्यापैकी केवळ 5 कोटी 88 लाख 21 हजार लिटर्स पाण्याचं बिलिंग होतं तर 1 कोटी 76 लाख लिटर्स पाण्याचा अनधिकृतपणे वापर केला जातो. म्हणजेच तब्बल 13 कोटी 92 लाख लिटर्स पाणी वाया जातंय.
गळतीमुळे जर 13 कोटी 92 लाख लिटर पाणी वाया जात असेल तर महापालिकेला प्रंचड आर्थिक तोटा सहन करावा लागतोय. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या जलअभियंत्यांनी समोर आलेल्या आकड्यांमध्ये काही त्रुटी असल्याचं समोर आलंय. मात्र दुसरीकडे पाणीगळती 30 ते 35 टक्के असल्याचं कबुलही करतायत...
शासकीय निकषानुसार 15 ते 20 टक्के गळती महत्तम प्रमाण मानली जाते. त्यापुढं होणारी गळती म्हणजे पाण्याचा अपव्यय मानन्यात येतो. तरी देखील कोल्हापूर महापालिकेला याचं सयोरसुतक नसल्याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय.
एकीकडं थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती प्रमाणं पाण्याचं महत्व सांगितलं जातं तर दुसरीकडं मात्र कोल्हापूर महानगरपालिका दररोज लाखो लिटर पाणी गळतीतून वाया घालवते. याला कोल्हापूर महा़पालिका प्रशासन जबाबदार आहे की डोळे झाकून गप्प बसलेले लोकप्रतिनिधी, असाच प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये आहे.