केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहणार, दोषींवर कारवाईचे आदेश
Kolhapur : शंभर वर्षांची परंपरा असलेलं कोल्हापूरमधील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
Kolhapur : कोल्हापुरातील ऐतिहासीक केशवराव भोसले नाट्यगृह (keshavrao bhosale natyagruha kolhapur)आगीत जळून खाक झालंय. गुरुवारी रात्री या नाट्यगृहाला भीषण आग लागली. तब्बल अडित तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. ही आग इतकी भीषण होती की शाहू खासबाग कुस्ती मैदानाचं स्टेज देखील या आगीच्या भक्षस्थानी पडलं. शाहू महाराजांनी अखंड हिदुस्थानातील हे पहिलं ओपन थिएटर बांधलं होतं. नाट्यगृहाला आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलं नाहीये.
कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग दुर्दैवी असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय
शॉर्टसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, पण नेमकी आग कशामुळे लागली याची आम्ही चौकशी करू असे देखील मुश्रीफ यांनी स्पष्ट केलंय. तर कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आगीची घटना अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केलीय.
'नाट्यगृह पुन्हा दिमाखात उभं राहिल'
केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या घटनेवर दुःख व्यक्त करतानाच ही वास्तू पुन्हा त्याच दिमाखात उभी राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आवश्यक खर्चाची तरतूद सरकारकडून केली जाईल, असे ते म्हणाले. या घटनेची संपूर्णपणे चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
कोल्हापूरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेली आग अत्यंत वेदनादायी आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी फोनवर चर्चा झाली असून घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेमुळे राज्यातील कलाप्रेमी दुःखी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेली ही ऐतिहासिक वास्तू अनेक दर्जेदार कलाकृती आणि कलाकारांच्या सादरीकरणाची साक्षीदार होती. केशवराव भोसले यांची आज जयंती असून पूर्वसंध्येला ही दुर्घटना घडणे वेदनादायी आहे. ही वास्तू पुन्हा एकदा दिमाखात उभी राहील आणि येथे कलाकृती सादर होत राहतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोल्हापूरला कलेचा वारसा आहे. अनेक कलाकार इथं घडले, त्यांच्या आठवणी वास्तूशी जोडलेल्या होत्या. त्यामुळेच ही वास्तू आगीत भस्मसात होणे, ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक हानी आहे अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. येथील कलेच्या वास्तू, कलाकार आणि कला या साऱ्याची जपणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.