लॉकडाऊच्या मुद्यावर व्यापारी - सरकार आमने सामने
शासनाच्या निर्णयाचा निषेध करत व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर फलक लावून याचा निषेध नोंदवला
प्रताप तपासे, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सध्या कोरोनाच्या ४ थ्या स्टेज मध्ये गेला आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेमधील दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे. मात्र चेंबर ऑफ कॉमर्सन आज सगळी दुकानं नऊ वाजल्यापासून उघडण्याचा इशारा दिलाय त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये संघर्ष अटळ आहे.
शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून कोल्हापूरातील व्यापाऱ्यांनी दुकानाबाहेर फलक लावून याचा निषेध नोंदवला आहे. तर आज पासुन दुकान कसल्याही परिस्थितीत सुरु करु असा देखील इशारा दिला आहे. शहरातील सर्व दुकान उघडण्यावर व्यापारी ठाम असल्याचं स्पष्ट होतंय.
महापालिका प्रशासनाने मात्र दुकान उघडला तर् कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. राजारामपुरी परिसरात व्यापारी आणि प्रशासन आमने सामने आले आहेत. व्यापारी आणि प्रशासन याच्यामधील वाद विकोपाला गेला आहे. पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी भूमिका घ्यावी, असा महानगरपालिका प्रशासनाने सांगितलं आहे.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स देखील दुकान उघडण्यावर ठाम असल्यामुळे हा वाद वाढत चालला आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर चेंबर ऑफ कॉमर्स आणि व्यापारी चर्चा करायला तयार झाले आहेत. चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी आणि व्यापारी पोलीस अधीक्षक यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.