कोल्हापुरातील मटणाचा वाद मिटला, `हा` झाला निर्णय
कोल्हापुरातील मटण दरावर अखेर तोडगा निघालाय.
कोल्हापूर : कोल्हापुरातील मटण दरावर अखेर तोडगा निघालाय. 520 रुपये प्रति किलो मटण विकण्यावर एकमत झालंय. मटण विक्रेते आणि कृती समितीच्या बैठकीत दरांवर निर्णय झालाय. गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापुरात मटण विक्री पूर्णपणे बंद होती. मटणाच्या दरावर तोडगा निघाल्याने खवय्यांमध्ये समाधान पहायला मिळत आहे.
कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मटण दर निश्चितीसाठी समिती स्थापन केली. पण समितीत येण्यास मटण विक्रेत्यांनी नकार दिला. तसंच मटणाच्या दरात केवळ २० रूपये कमी कऱण्याची आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीला मटण विक्रेते गैरहजर राहिले होते.
मटणाचे दर ५४० रूपयांच्या खाली येणार नाहीत यावर विक्रेते ठाम होते. या आडमुठेपणामुळे ग्राहक समिती संतापली होती. मटणाला किलोमागे ४५० रूपयांच्यावर एक नया पैसाही देणार नाही अशी भूमिका ग्राहक समितीने घेतली होती. अखेर नुकत्याच झालेल्या बैठकीत ५२० रुपये प्रति किलो मटण विकण्यावर तोडगा निघाला.