संतापलेल्या कोल्हापूरकरांचं तांबड्या-पांढऱ्या रस्स्यासाठी भन्नाट आंदोलन
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हा कोल्हापूरकरांचा पिंड आहे...
प्रताप नाईक झी मीडिया कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील मटण खवय्ये सध्या हैराण झालेत. आधीच महागाई आणि त्यात मटणाचे वाढलेले भाव यामुळे कोल्हापूरकर संतापले.. त्यामुळे कोल्हापूरकरांनी मटन भाव वाढी विरोधात अभिनव आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरात भल्या पहाटे तुम्हाला भलीमोठी रांग दिसेल... ही लाईन बस स्टॉपवरची नाही किंवा एखाद्या रेशनिंग दुकानाच्या बाहेरचीही नाही... सकाळी सकाळी जवळपास अर्धा किलोमीटरची ही लाईन लागते ती मटण खरेदी करण्यासाठी... सवलतीच्या दरात एक नंबरी मटण विक्री केंद्राबाहेरची ही गर्दी आहे. आता तुम्ही म्हणाल, मटणाचं दुकान आणि 'सवलतीच्या दरात एक नंबरी मटण विक्री केंद्र' यात नेमका फरक काय?
त्याच झालं असं... कोल्हापुरात मटन विक्री करणाऱ्या दुकानदारांनी मटणाचे भाव तब्बल ५८० ते ६०० रुपये किलोवर गेलेले दिसत आहेत. मग आठवड्यातून संधी मिळेल तेव्हा मटणावर ताव मारणाऱ्या कोल्हापूरकरांना मटणाची ही भाववाढ कशी काय परवडणार... म्हणूनच सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्रंबोली यात्रेच्या पार्श्वभूमीवर ४२५ रुपये किलो अशा सवलतीच्या दरात एक नंबर मटन विक्री केंद्र थाटायला सुरुवात केलीय. संयुक्त राजारामपुरी तरुण मंडळाचे सदस्य बाबा इंदुलकर यांनी ही माहिती दिलीय.
मटण विक्रेते महागाईचे कारण देत मटणाची दर कमी करायला तयार नाहीत. सुरुवातीला कोल्हापूर शहरातील कसबा बावडा इथल्या तरुण मंडळांनी मटन विक्रेत्यांना दर कमी करण्याची विनंती केली... त्यांनी ही विनंती धुडकावताच मटन थेट नदी पलीकडून आणण्याचा बोर्ड झळकावला... आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या आंदोलनाची ठिणगी पडली...
अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हा कोल्हापूरकरांचा पिंड आहे. जेवणातला प्रमुख पदार्थ असणारा तांबडा-पांढरा रस्सा आणि झणझणीत मटण जर महागलं तर कोल्हापूरकर कसं काय गप्प बसतील... म्हणूनच मटन विक्रेत्या दुकानदाराने मटणाचे वाढविलेली दर कमी केले नाहीत तर अशाच पद्धतीचा पर्याय शोधला जाणार आहे. कोल्हापूरकर खटक्यावर बोट टांगा पलटी करून मटणाचे वाढलेले भाव कमी करूनच घेतील यात शंका नाही.