प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur News) गेल्या काही दिवसांपासून श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानाच्या (Shree Chhatrapati Rajaram Cooperative Sugar Factory) पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार शिगेला पोहचला आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच गाजली आहे. या निवडणूकीचा प्रचार शुक्रवारी सायंकाळी संपला असून रविवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदान प्रकियेसाठी सर्व यंत्रणा सतर्क झाले असून जिल्ह्यातील एकूण 58 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान केंद्र परिसरात 144 कलम लावण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाडिक आणि पाटील यांची एकमेकावर जोरदार चिखलफेक


कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सतेज पाटील आणि महाडिक यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होत्या. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार आणि सभा घेत वैयक्तिक पातळीवर टीका करण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीच दोन्ही गटाकडून बिंदू चौकात येण्याचे आव्हान आणि प्रतिआव्हान देत शड्डू ठोकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आहे. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी नेते माजी आमदार महादेराव महाडिक आणि विरोधक आमदार सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.


रविवारी प्रत्यक्ष मतदान


प्रचाराच्या धुरा शांत झाल्यानंतर रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार असून या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, करवीर, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यांतील एकूण 58 मतदान केंद्रांवर उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडणार आहे. त्यासाठी 580 कर्मचाऱ्यांच्या नेमणुका केल्या असून एका केंद्रावर दहा अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात संपन्न व्हावी यासाठी मतदान केंद्र परिसरात जमाबंदी आदेश देखील लागू करण्यात आली आहे.


25 एप्रिलला मतमोजणी


मतदान पार पडल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच 25 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे मतमोजणी सुरुवात होणार आहे. ही निवडणूक एकूण 21 जागांसाठी होत असून 13407 उत्पादक सभासद आहेत. तर संस्था सभासद हे 129 इतके आहेत. त्यामुळे आता सभासद आपलं मत कोणाला देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.