प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापुरात मटणाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाहीये. जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीला मटण विक्रेत्यांनी दांडी मारली, तर ग्राहक समितीनेही कठोर भूमिका घेतली आहे. गेले महिनाभर मटण दरवाढीचा तिढा कायम आहे. मटण विक्रेते आणि ग्राहक आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयात हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मटण दर निश्चितीसाठी समिती स्थापन केली. पण समितीत येण्यास मटण विक्रेत्यांनी नकार दिला. तसंच मटणाच्या दरात केवळ २० रूपये कमी कऱण्याची आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा बैठक बोलावली. या बैठकीला मटण विक्रेते गैरहजर राहिले.


मटणाचे दर ५४० रूपयांच्या खाली येणार नाहीत यावर विक्रेते ठाम आहेत. या आडमुठेपणामुळे ग्राहक समिती संतापलीय. मटणाला किलोमागे ४५० रूपयांच्यावर एक नया पैसाही देणार नाही अशी भूमिका ग्राहक समितीने घेतलीय.


या पार्श्वभूमीवर आता शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या मटण दर निश्चिती समितीचा अहवाल येणार आहे. यात दर कमी करण्याची शिफारस झाली असेल तर विक्रेते काय भूमिका घेतात हे पाणं औत्सुक्याचं असणार आहे. त्यामुळे संघर्ष अटळ आहे.