प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :   वृक्ष लागवडीतला भ्रष्टाचार झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर कोल्हापूर वनविभागातील चौघांचं निलंबन करण्यात आलं. पण अद्याप सांगली-सातारा वनविभागातील दोषींवर कुठेही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे या भ्रष्टाचाराबाबत वनविभाग खरंच गंभीर आहे की हा फार्स आहे, अशी शंका आल्यावाचून राहत नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 कोटी वृक्ष लागवडीत झालेला भ्रष्टाचार झी मीडियानं उघडकीस आणल्यानंतर कोल्हापूर वनविभागातल्या करवीर वन परिक्षेत्रातल्या चौघांचं निलंबन झालं. मात्र सांगली आणि सातारा वन विभागात भ्रष्टाचार केलेल्या जबाबदार अधिकारी आणि कर्मचा-यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळं वनविभागात कुठं तरी पाणी मुरतय, असं म्हणायला वाव आहे. इतकंच नव्हे तर सातारा आणि सांगली वनविभागात चौकशी सुरु होण्याआधीच कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांनी सांगली आणि सातारा वनविभागातील वनाधिका-यांना क्लिन चिट देवून टाकली होतं. 


इतकंच नव्हे तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा वनविभागातील प्रत्येक खड्यांना सरसकट 920 रुपयांचा दर कसा लावला, कुठल्या मॉडेलचा आधार घेतला असा प्रश्न देखील आमच्या प्रतिनिधींनी मुख्य वनरंक्षक अरविंद पाटील यांना विचारला.  त्यावेळी  त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांनीच एक बाय, एक खड्यांच्या मॉडेलला परवानगी दिल्याचं सांगितलंय.


 
झी 24 तासनं सर्व पुरावण्यानिशी कोल्हापूरबरोबरच सांगली आणि सातारा जिल्ह्यातील वनविभागात कसा भ्रष्टाचार झालाय हे उघड केला होता. पण अजूनही तिथल्या अधिकारी आणि कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. झी 24 तासकडे  सांगली आणि सातारा वनविभागात अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्वत: चुका झाल्याचं मान्य केलंय. मग अजूनही कारवाई का झाली नाही हा सवाल आहे. किमान आतातरी वनमंत्र्यांनी या सर्व भ्रष्टाचाराची त्रयस्त यंत्रणेमार्फत चौकशी करावी तरंच सत्य बाहेर येईल.