CORONA UPDATE : कोल्हापुरात कोरोनाचा कहर, सर्वाधिक 50 % मृत्यूदर कोल्हापुरमध्ये
जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अजूनही नियंत्रणात येत नसल्याने याची दखल आता थेट केंद्राने घेतली आहे. केंद्राचं एक पथक कोल्हापूरमध्ये दाखल झाल आहे.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्हिटीचं सर्वात जास्त प्रमाण कोल्हापूर मध्ये आहे. निर्बंधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 80 हजार 916 लोकांना कोरोनाची बाधा झालीय. तर तब्बल 5 हजार 130 रूग्णांचा कोरोनानं मृत्यू झालाय. वाढत्या मृत्यूदरानं कोल्हापुरकरांची चिंता वाढलीय.
कोल्हापूरमध्ये अजूनही दिवसाला एक हजार ते पंधराशे नवे रुग्ण आढळत असून पॉझिटिव्हिटी रेट 17 टक्क्यांहून अधिक आहे. एका बाजूला राज्यात तिसरा लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच कोल्हापूर जिल्हा मात्र अजूनही दुसऱ्या लाटेतून मुक्त झालेला नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्रीय पथकानं काही उपाययोजनादेखील सुचवल्या होत्या. मात्र त्यानंतरही कोल्हापुरातल्या रूग्णसंख्येत घट झालेली नाही. अशातच कोल्हापुरातले व्यापारी मात्र दुकानं सुरू करण्यासाठी आक्रमक झालेत.
कोरोनाबाबत प्रशासनाची करो या मरोची लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राची त्रिसदस्यीय समिती कोल्हापुरात दाखल झालीय. या समितीनं आरोग्य विभागाची झाडाझडती घेत प्रशासनाला अनेक सूचना केल्या आहेत. कोल्हापुरातील रुग्ण वाढीच्या आणि मृत्यू दराच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न ही समिती करणार आहे. रोजचे टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची स्थिती, व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता, तिसर्या लाटेसाठी केलेली तयारी याची सविस्तर माहिती प्रशासनाला या समितिला द्यावी लागणार आहे.
त्याला काय होतंय, या अविर्भावामुळे अनेक कोल्हापूरकर आजही रस्त्यावरून विना मास्क फिरताना दिसतात. नियमांचा फज्जा उडाल्यानं इथं दुसरी लाट ओसरताना दिसत नाही. त्यामुळे या सगळ्यातून मार्ग काढत कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.