कोल्हापुरातील राधानगरी धरण शंभर टक्के भरलं, स्वयंचलित दरवाजे उघडले
नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरात राधानगरी धरण शंभर टक्के भरलं, त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. सकाळी ११-३० वाजता राधानगरी धरणाचा सहावा स्वयंचलित दरवाजा उघडला गेला. त्यामुळे राधानगरी धरणातून २हजार ८२८ क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे, त्यामुळे पंचगंगा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
कोल्हापूरात पावसाची संततधार सुरु आहे. कोल्हापूर शहरासह सातारा, सांगली परिसरात देखील पावसानं जोर धरला आहे. त्यामुळे सर्व नद्या दुधाडी भरून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर असलेल नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर देखील पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली गेल आहे. मंदिराचा कळस वर दिसत आहे.
संध्याकाळ पर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्यास हा कळस देखील पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान मंदिरातील दत्ताच्या पादुका दर्शनासाठी दुसरीकडे ठेवण्यात आल्या आहेत.