प्रताप नाईक, झी २४ तास, उंबरवाडी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण देश आज शोकसागरात बुडाला. दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झालेले शूर जवान जोतिबा चौगुले यांना आज साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. भारतमातेच्या रक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या उंबरवाडीचे सुपुत्र जोतिबा चौगुले यांनी देह धारातीर्थी ठेवला. हुतात्मा जोतिबा चौगुले यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मराठा लाईट इन्फन्ट्रीत हवालदारपदावर कार्यरत असलेले जोतिबा चौगुले यांना जम्मू काश्मीरच्या राजौरीत दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतमातेच्या रक्षणासाठी३७ वर्षांच्या या जवानाने अगदी हसत हसत मरण कवटाळलं पण दहशतवाद्यांना या देशात थारा मिळणार नाही याची खात्री करूनच देह ठेवला. जोतिबा यांना त्यांचा ९ वर्षांचा मुलगा अथर्व याने अग्नी दिला. वडिलांना अथर्वने अखेरचा सलाम केला आणि प्रत्येक सहृदयी भारतीयाचे डोळे भरून आले.जोतिबा यांचं बलीदान व्यर्थ जावू नये, देशाच्या शत्रूला तातडीने धडा शिकवावा अशी मागणी वीरपत्नी यशोदा चौगुले यांनी केलीय.


बालपणापासूनच धाडसाची जोतिबा यांना आवड होती. २००२ साली वयाच्या अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी लष्करी सेवेत प्रवेश केला. तेव्हापासून जम्मू काश्मीरमध्ये अनेक मोहिमा चौगुले यांनी पाहिल्या, लढल्या. आपल्या लाडक्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड जनसागर लोटला होता.


जोतिबा चौगुले यांच्या रूपाने सह्याद्रीच हिमालयाच्या मदतीला धावला. या राज्याच्या सुपुत्रांनी प्राणपणाने या देशाचं रक्षण केलंय. ही थोर परंपरा जोतिबा चौगुले यांनीही कायम राखली. देशाचे सुपुत्र हवालदार जोतिबा चौगुले यांना 'झी २४ तास'कडून मानाचा मुजरा... जोतिबा सर तुमचं कधीही विस्मरण होणार नाही, महाराष्ट्र तुमचे उपकार, तुमचं कार्य कधी विसरणार नाही. जय हिंद...