मटण महागल्याने कोल्हापूरकरांची सटकली, छेडलं अनोखं आंदोलन
कारण कोल्हापूरचं सगळंच वेगळं असतं.
प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूरचं सगळंच वेगळं असतं. तिथलं खाणंपिणं असो की तिथलं राजकारण. आता आपलं लाडकं मटण महागल्यानं कोल्हापूरकरांची सटकली आहे. मटण महागल्यामुळे कोल्हापूरकरांनी चक्क आंदोलन छेडलं आहे.
आमच ठरलंय... मटण नदीच्या पलीकडनं आणायचं. एका मंडळानं लावलेला हा बोर्ड सध्या कोल्हापूरकरांचं लक्ष वेधून घेतोय. का काय विचारता? अहो विषयच तसा हार्ड हाय. कोल्हापूरकराचं मटणाशी अतूट नातं. मग मटण महाग लागत असेल तर कसं चालंल? ४०० ते ४२५ रुपये किलो दरानं मिळणारं मटण कसबा बावडा परिसरात ५८० रुपयांच्या घरात गेलंय. त्यामुळे भारतविर मित्र मंडळची सटकली आहे.
आठवड्यातून चार-चारदा मटणावर ताव मारणारे अनेक कोल्हापूरकर आहेत. या खवय्यांचं बजेट महागलेल्या मटणानं कोलमडलंय. कोल्हापूरकरच नव्हे, तांबडा-पांढरा रस्सा ओरपण्यासाठी देशभरातून लोक इथं येतात. पण मटण महागल्यानं हॉटेलवाल्यांचीही पंचाईत झाली आहे.
कोल्हापूरचं सगळंच वेगळं असतंय. भाजीपाला महाग झालेला चालेल एकवेळ, पण मटण ? ते कसं चालंल. त्यामुळेच वेळप्रसंगी त्यासाठी रस्त्यावरही उतरतील कोल्हापूरकर.