रशियातील जहाज दुर्घटनेत कोल्हापूरचा तरुण बेपत्ता
रशियातील जहाज दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली इथला युवक बेपत्ता
मुंबई : रशियातील जहाज दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली इथला युवक बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर येत आहे. अक्षय बबन जाधव असे या तरुणाचे नाव असून तो मुंबई मधील जे. बी.नगर मधील एका माल वाहतूक जहाज कंपनीमध्ये अक्षय नोकरीला आहे. रशियाच्या काळ्या समुद्रात मालवाहू जहाजाने पेट घेतल्यामुळे जहाजावरील 14 खलाशी बेपत्ता असल्याची माहिती रशियाच्या सरकारने दिली आहे. या बेपत्ता झालेल्यांमध्ये अक्षयचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर भयभीत झालेल्या अक्षयच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई मधील कंपनीच्या ऑफीस मध्ये धाव घेतली आहे.
रशियाच्या काळ्या समुद्रात मालवाहू जहाजाने पेट घेतल्याने काही जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहितीही समोर येत आहे. अंधेरी मधील ऑफिसमधून काही लोकांना यासंदर्भात माहिती देण्यात आली. सकाळी 10 वाजता अक्षयचे कुटुंबियांना मिळालेली अधिकृत माहिती ते सर्वांसमोर आणतील. त्यानंतर याप्रकरणात अधिक स्पष्टता येऊ शकेल. अक्षयचे कुटुंबिय कंपनीच्या ऑफिसच्या बाहेर माध्यमांशी बोलणार आहेत. या दुर्घटनेत
भारतातील एकूण चार खलाशी बेपत्ता आहेत तर महाराष्ट्रातील दोन तरुण बेपत्ता आहेत. त्यामुळे हा फार चिंतेचा विषय बनला आहे.