प्रफुल्‍ल पवार / रायगड : कोकणातील अनेक गावांमध्‍ये वेगवेगळया परंपरा आजही जपल्‍या जात आहेत. त्‍यामागची कारणंही वेगवेगळी आहेत माणगाव तालुक्‍यातील येलावडे ग्रामस्‍थांनीही अशीच वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा जपली आहे. नेमकी आहे तरी काय ही परंपरा? सहयाद्रीच्‍या कुशीत वसलेले माणगाव तालुक्‍यातील येलावडे गाव. जवळपास सव्‍वाशे उंबऱ्यांच्‍या या गावात एक दिवस चक्‍क शुकशुकाट दिसतो. एरव्‍ही गजबजलेल्‍या या गावामध्‍ये कोणीही दिसत नाही. त्‍याचे कारणही तसेच आहे. सगळी लहानथोर मंडळी गावाच्‍या वेशीबाहेर रहायला जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गावाबाहेरच्‍या ओसाड मैदानावर पाल किंवा झोपडया उभारून सगळे एक दिवस आणि एक रात्र तिथेच राहतात. दर बारा वर्षांनी गाव असेच रिकामे होते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा ग्रामस्‍थांनी आजही सुरू आहे. सकाळी तांबडे फुटण्‍याआधीच ग्रामस्‍थ आवश्‍य‍क सामानसुमान घेवून गावाबा‍हेर पडतात आणि आधीच तयार करून ठेवलेल्‍या पालाकडची वाट धरतात. येलावडे ग्रामस्‍थांसाठी हा मोठा उत्‍सव असतो. त्‍याला स्‍थानिक भाषेत रिगवणी किंवा गावटाकणी असे म्‍हणतात. कामानिमित्त  बाहेरगावी स्‍थायिक असले तरी या कार्यक्रमाला सगळे चाकरमानी पोराबाळांसह झाडून हजेरी लावतात. ग्रामदेवतेला वस्‍त्रालंकारांनी सजवले जाते. मंदिरात पूजाअर्चा भजन असे धार्मिक कार्यक्रम पार पडतात.


यानिमित्‍तानं सारा गाव मोकळया मैदानावर गोळा झालेला असतो. पाहुण्‍यांचीही हजेरी असते. महिलांची नाचगाणी, फुगडया सुरू होतात. तरूण मुलं क्रिकेट किंवा इतर मैदानी खेळ खेळण्‍यात दंग असतात. तर वयस्‍कर मंडळी स्‍वयंपाक बनवण्‍याच्‍या कामात व्‍यस्‍त. त्‍यानंतर सामूहिक भोजन होते. संपूर्ण रात्र तिथे जागून काढली जाते. यानिमित्‍ताने नेहमी न भेटणारे मित्र मैत्रीणी, नातेवाईक हमखास भेटतात आणि गप्पांचा फड रंगतो.


येलावडे गावची ही परंपरा नेमकी कधी सुरू झाली हे गावातील कोणालाच माहिती नाही. आजच्‍या विज्ञान युगातदेखील ही परंपरा पुढच्‍या पिढीने जपावी, असा ग्रामस्‍थांचा मानस आहे. आख्‍यायिका, कथा, दंतकथा काहीही म्‍हणा परंतु या निमित्‍ताने ग्रामस्‍थ आपल्‍या एकीचे दर्शन घडवतात एवढे मात्र नक्‍की.