मुंबई : रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रत्नागिरीसाठी सुरु करण्यात आली. मात्र, विरोध असताना तांत्रिक कामाच्या नावाखाली आणि काही लोकांच्या हट्टाने ती मडगावपर्यंत नेण्यात आली. हळूच ही गाडी मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजर अशी करण्यात आली. रत्नागिरीत गाडी खाली झाल्यानंतर ही गाडी मडगावला रिकामी (खाली) नेण्यात येण्यात येते. मात्र, येताना ती रत्नागिरीत भरुन येते, याला कोकण रेल्वे प्रशासनाचे सुपीक डोके जबाबदार आहे, असा आरोप आता प्रवासी करु लागले आहेत. 


चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सण - उत्सवात गाड्यांना प्रचंड गर्दी होते. गाडीत चढणे कठिण होते. आता तर रत्नागिरीकरांसाठी राखीव डबे ठेवण्यात येणार आहेत. मात्र, हा उपाय कुचकामी ठरणार आहे. कारण रेल्वे स्थानकावरील गर्दी लक्षात घेता भविष्यात मोठा अपघात किंवा चेंगराचेंगरीची दुर्घटना घडू शकते, याचा रेल्वे प्रशासनाने विचार केलेला दिसत नाही. केवळ कातडी वाचविण्यासाठी आणि रत्नागिरी-दादर पॅसेंजर मडगाव अशी कायम करण्यासाठी सुपीक डोक्यातून आलेली ही कल्पना असल्याची कुजबुज सुरु आहे.


तातपुरता उपाय कशासाठी?


मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजरचे रत्नागिरीसाठी राखीव असलेले डबे आता रत्नागिरीतच उघडणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं दिलीय. मडगावहून सुटणारी दादर पॅसेंजर तळकोकणातूनच भरून येते. त्यामुळे रत्नागिरीमधील प्रवाशांना परतीचा प्रवास करताना जागा मिळत नाही.


विशेष म्हणजे रत्नागिरी, चिपळूण, खेडसाठी आरक्षित डब्बेदेखील तळ कोकणातून येणारे प्रवासी उघडतात. त्यामुळे रत्नागिरी स्थानकावरील प्रवाशांना डब्यांमध्ये प्रवेश करता येत नाही. त्यामुळे मंगळवारी मडगाव-रत्नागिरी-दादर पॅसेंजरमध्ये गोंधळ उडाला होता. हा अनुभव लक्षात घेऊन आता त्या त्या स्थानकासाठी आरक्षित असलेले डबे त्याच ठिकाणी उघडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 


रिकाम्या डब्यांसाठी डिझेल वाया!


दरम्यान, मडगाव ते रत्नागिरी रिकामी डबे ठेऊन उपयोग काय, डिझेल, पैसे आणि वेळ वाया कशासाठी? आमची रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही गाडी रत्नागिरीतूनच सुटली पाहिजे. तसेच पनवेल - चिपळूण अशी नवी गाडी सुरु करण्यात यावी, अशी मागणी आता प्रवासीवर्गातून जोर धरु लागली आहे. भविष्यात चिपळूण आणि खेड दरम्यानच्या लोटे औद्योगिक वसाहतीत रेल्वेचा कारखाना उभा राहणार आहे. त्यामुळे रत्नागिरी येथे रेल्वेच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी व्यवस्था करावी. तसेच रेल्वे रुळाच्या दुहेरीचे काम सुरु आहे. त्यामुळे रत्नागिरीचे महत्व वाढणार आहे. रत्नागिरीचे महत्व कमी करण्यासाठी मडगावला झुकते माप देण्यासाठी खटाटोप का, असा सवाल प्रवासी वर्गातून विचारण्यात येत आहे.