मुंबई : येत्या काही महिन्यात कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरुन डिझेल इंजिनावर धावणाऱ्या सर्व गाड्या बंद होणार आहेत. आता यापुढे या मार्गावरुन फक्त विजेवर चालणाऱ्या गाड्याच धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर अलिकडेच पहिले विद्द्युत इंजिन धावले आहे. (Electrification Route Konkan Railway) या इंजिनाची ट्रायल घेण्यात आली. त्यामुळे आता धूर सोडणारे इंजिन धावणार नाही. तसेच इंजिनाचा वेगही वाढणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवास वेगवान होणार आहे.  (Konkan Railway conducts trial run of electric loco between Ratnagri - Roha)


रोहा ते रत्नागिरी पहिले विद्द्युत इंजिन धावले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोकण रेल्वे मार्गावर गेल्या चार-पाच वर्षांपासून सुरू असलेले विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्याकडे आले आहे. रोहा ते रत्नागिरी या दरम्यान 22 फेब्रुवारीपासून OHE अर्थात ओव्हरहेड इलेक्ट्रीक वाहिनीमधून 25 KV चा विद्द्युत प्रवाह टेस्टिंगसाठी कार्यान्वित केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर लोकोमोटिव, कोच मेंटेनन्स आदी कर्मचाऱ्यांना कोकण रेल्वेच्या रिजनल मेकॅनिकल इंजिनिअर, रत्नागिरी यांच्याकडून सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. 23 फेब्रुवारीपासून वीज प्रवाहाची तपासणी करण्यात आल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा वीजेवर धावणारे इंजिन चालवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी असे पहिले विद्द्युत इंजिन धावले. ही यश्स्वी चाचणी झाल्याने आता कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या यापुढे विजेवर चालणार आहेत.


यानंतर धावणार विजेवर गाड्या


रोहा ते रत्नागिरी दरम्यान, विद्युतीकरण पूर्णत्वाला गेले आहे. या मार्गावर गुरुवारी 203 किमीची 'ट्रायल रन' पूर्ण केलेले इलेक्ट्रिक इंजिन रत्नागिरी येथून पुन्हा रोह्याकडे रवाना झाले. रोहा ते करंजाडी आणि दिवाण खवटी ते रत्नागिरी या रेल्वे मार्गावर ही इंजिन चाचणी यशस्वी झाली. त्यामुळे आता कोकण रेल्वे मार्गावर डिझेल ऐवजी वीजेवरील इंजिनाच्या सहाय्याने मेल-एक्स्प्रेस धावणे शक्य होणार आहे. या चाचणीमुळे आता कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर रोहा ते रत्नागिरीदरम्यान रेल्वे गाड्या विजेवर धावणार आहेत. दरम्यान, त्याआधी कोकण रेल्वेच्या दक्षिण भागात जानेवारी 2021 मध्ये कोकण रेल्वेने ठोकूर-उडुपी दरम्यान इलेक्ट्रिक लोको यशस्वी चाचणी घेतली होती.


कोकण रेल्वेचे 200 कोटी वाचणार


तसेच कोकण रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. वीर ते रोहापर्यंत दुहेरी मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तसेच काही रेल्वे स्थानकादरम्यानही दुहेरी मार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे यापुढे कोकण रेल्वे मार्गाचा वेग आणखी वाढणार आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचा प्रवास वेगवान होणार आहे. तसेच या विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेचे 200 कोटी रुपये वाचणार आहेत. सध्या डिझेलवर रेल्वेला 300 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. मात्र, आता विजेवर गाड्या धावण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च लागण्याची शक्यता आहे. तसेच प्रदूषण मुक्त प्रवास होणार आहे. विद्युतीकरणामुळे प्रदूषण टळणार आहे. त्यामुळे निसर्गाला कोणतीही बाधा पोहोचणार नाही.