गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना `या` तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं `असं` करा बुकिंग
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाला कोकणात जाणारा एक मोठा वर्ग आहे. गणपती आणि कोकणाचं एक खास नातं आहे. त्यामुळे नवीन वर्ष सुरु झालं की, कोकणी माणूस पहिलं गणपतीचे आगमन पाहतो, असं म्हटलं जातं. अशावेळी कोकणात जाणारा मोठा चाकरमानी वर्ग आहे. पण कोकणातील गणेशोत्सवाच्या काळातील प्रवास अतिशय कठीण असतो. अशावेळी कोकणात गणेशोत्सवात कशी आरक्षण सेवा असणार आहे, याची सर्व माहिती जाणून घ्या.
एसटीचे आरक्षण उद्यापासून
यंदा बाप्पाचं आगमन हे 7 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. आता अवघ्या 2 महिन्यांचा कालावधी उरला आहे. अशावेळी गणेशोत्सवासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नियमित आणि विशेष गाड्यांचं आरक्षण उद्यापासून खुलं होणार आहे. समूह आणि वैयक्तिक आरक्षणासह परतीचे आरक्षणही प्रवाशांना उद्यापासून करता येणार आहे. सध्या धावणा-या नियमित गाड्या वेळापत्रकाप्रमाणे सुटतील. मुंबई सेंट्रल, परळ, पनवेल आणि कुर्ला नेहरूनगरमधून 2 आणि 3 सप्टेंबरपासून जादा गाड्या सुटणार आहेत. कणकवली, राजापूर, विजयदुर्ग, दापोली, भालावली, देवगडदरम्यान जादा एसटी फे-या चालवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवासाठीचे जादा गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
कोकण रेल्वे
कोकणात जाणारा चाकरमानी कोकण रेल्वेने प्रवास करतो. अशावेळी रेल्वेमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी पनवेल ते खेड, वसई ते चिपळून, दिवा ते चिपळूण, दादर ते रत्नागिरी, पनवेल ते रत्नागिरी, डहाणू ते पनवेल या मार्गावर अनारक्षित मेमू चालवण्याची मागणी प्रवासी समितीनं आहे. तसेच 24 कोचची तुतारी एक्स्प्रेस आणि दादर, रत्नागिरीदरम्यान डबल डेकर अनारक्षित ट्रेन चालवण्याची मागणीसुद्धा रेल्वे प्रवासी सेवा समितीनं केली आहे.
63 सेकंदात आरक्षण फुल्ल
गणेशोत्वाच्या काळात कोकणात जाण्यासाठी रेल्वेची बुकिंग 7 मे रोजी सुरु झालं आहे. गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधी म्हणजे 4 सप्टेंबर रोजीचे आरक्षण 7 मे रोजी सकाळी 8 वाजता सुरू झालं. यानंतर अवघ्या 63 सेकंदात कोकणकन्या एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट 580 च्या पार गेली आहे. कोकणात जाणाऱ्या अन्य ट्रेन्सचं बुकिंगही फुल्ल झालं आहे. वेटिंग लिस्ट 500 च्या पार गेली आहे. यानिमित्ताने आधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती.