कोकणातल्या विद्यार्थ्यांची रेसिंग कार धावणार लंडनच्या ट्रॅकवर
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘महालक्ष्मी 08 रेसिंग’ हा चमू गेली चार वर्ष या कारची निर्मिती करत आहे.
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : देवरूखजवळच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली रेसिंग कार आता थेट लंडनच्या फाँमुर्ला वनच्या ट्रॅकवर धावणार आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीपलीकडे गाड्यांच्या शर्यतीची काहीही परंपरा नसलेल्या कोकणातील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चिकाटी, संशोधन आणि परिश्रमांच्या बळावर निर्माण केलेली ‘महालक्ष्मी-4’ ही रेसिंग कार येत्या जुलैमध्ये लंडनच्या सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रॅकवर धावणार आहे. या अपूर्व कामगिरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'आय मेक फॉम्र्युला स्टुडंट' या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे 1998 पासून आयोजित केल्या जात असलेल्या या उपक्रमामध्ये पेट्रोल-डिझेल गटामध्ये भारतातून या एकमेव कारचा सहभाग राहणार आहे.
संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘महालक्ष्मी 08 रेसिंग’ हा चमू गेली चार वर्ष या कारची निर्मिती करत आहे. अथक प्रयत्नांती सुमारे 210 किलो वजनाची आणि 8 फूट लांबीची ही कार आता सिल्व्हर स्टोन सर्किट ट्रॅकवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे.
रेसिंग कारचा आराखडा तयार करून प्रत्यक्ष निर्मितीच्या या उपक्रमाची मुहूर्तमेढ पाच वर्षांपूर्वी, 2014 मध्ये या महाविद्यालयात शिकणाऱ्या निखिल कारेकर आणि विद्याधर दाते यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या ‘एमएच 08 रेसिंग’या चमूने केली. ऑटोमोबाइल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल इत्यादी निरनिराळ्या शाखांमधील उत्साही तरुणांचा सहभाग असलेल्या या चमूने रेसिंग कार निर्माण करण्याचा ध्यास घेतला आणि पुढच्याच वर्षी, 2015 मध्ये कोइम्बतूरच्या करी मोटर्स स्पीडवेच्या ट्रॅकवर ‘महालक्ष्मी-1’ ही रेसिंग कार उतरवली. तेथे झालेल्या ‘फॉम्र्युला डिझाइन चॅलेंज इंडिया 2015’ या स्पर्धेत या गाडीला 21वे स्थान मिळाले. त्यातून ‘एमएच 08 रेसिंग’च्या सदस्यांचा आत्मविश्वास इतका वाढला की,‘फॉम्र्युला स्टुडंट इंडिया 2016’ या स्पर्धेत त्यांनी बनवलेली ‘महालक्ष्मी-2’ ही रेसिंग कार उतरवली आणि ती ‘द मोस्ट पॉप्युलर रेसिंगकार’ म्हणून गौरवण्यात आली. ही स्पर्धा देशातील फॉर्मुला-1 ही जागतिक दर्जाची स्पर्धा भरवणाऱ्या ग्रेटर नोडाडातील बुद्धा इंटरनॅशनल सर्किटवर झाली. यानंतर 2017 मध्ये कोइम्बतूरला आयोजित स्पर्धेत ‘महालक्ष्मी-3’ या कारने ‘बेस्ट डिझाइन कार’, तर गेल्या वर्षी बनवलेल्या ‘महालक्ष्मी-4’ या कारने ‘बेस्ट डिझाइन’ आणि ‘लाइटेस्ट रेस कार ऑफ इंडिया’ हे दोन्ही किताब पटकावले. हीच कार आवश्यक तांत्रिक बदल करून लंडनच्या स्पर्धेत धावणार आहे.
'जगभरातील सुमारे दीडशे विद्यापीठांमधील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी फक्त 100 वाक्यांत कारच्या तांत्रिक वैशिष्टय़ांची माहिती व व्यावसायिक गुणवत्ताही पटवून देण्याची अवघड परीक्षा द्यावी लागली. गेली चार वर्ष चालू असलेल्या या उपक्रमातील कारच्या बांधणीचे अंतिम टप्पे आणि प्रत्यक्ष ट्रॅकवरील चाचण्या किंवा सराव कोल्हापुरात होत असल्याने महालक्ष्मीचे नाव तिला देण्यात आल्याचे धनंजय सार्वेकर आणि प्रणित वाटवे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
'विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा म्हणून महाविद्यालय अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी नेहमी प्रोत्साहन देते. यातूनच जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर विद्यार्थ्यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली ही निवड आमच्यासाठी गौरवाची आणि अभिमानास्पद बाब आहे', असे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी सांगितले. सुविधांचा अभाव असूनही दैनंदिन अभ्यास, प्रात्यक्षिके, परीक्षा इत्यादीमधून कोणतीही सवलत न घेता अक्षरश: रात्रीचा दिवस करून त्यांनी निर्माण केलेल्या या कारची कामगिरी भारतासाठी लक्षवेधी ठरणार आहे.