डोंबिवलीकरांची कोंडी होणार, पत्रीपुलाप्रमाणे कोपर पुलही रखडणार?
कल्याणकरानंतर डोंबिवलीकरांची ही कोंडी होणार
आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपर पूल रविवारी संध्याकाळपासून बंद करण्यात येणार आहे. कमकुवत असलेला हा पूल बंद करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतलाय. पण त्याच्या पुढं काय हे मात्र रेल्वेनं सांगितलेलं नाही. हा पूल दुरुस्त करणार की तोडून पुन्हा नवा बांधणार याचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे कल्याणच्या पत्रीपुलासारखीच कोपर पुलाची रखडपट्टी होणार का असा प्रश्न डोंबिवलीकरांना सतावतो आहे.
नव्या पुलाचा निर्णय झालेला नाही. मात्र त्या अगोदरच जुना कोपर पूल बंद करण्यात आला आहे. हा आडमुठा निर्णय घेऊन रेल्वे आणि महापालिका प्रशासन डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीच्या संकटात टाकत आहे. पूर्व पश्चिमेला जोडणारा ठाकुर्ली उड्डाणपूल आहे मात्र तो चिंचोळा आहे. त्यामुळं डोंबिवलीत आता दिवसभर वाहतूक कोंडी राहणार आहे.
कल्याणमधील पूल पाडण्यात आला आहे. पण त्यानंतर अजूनही पत्रीपुलाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. कल्याणकर वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असताना आता डोंबिवलीकरांना शहरातल्या शहरात फिरणंही अवघड होऊन बसणार आहे.