Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींच्या तारखा घोषित झाल्या आहेत. राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या याद्यादेखील जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. राज्यातील दोन मोठ्या पक्षांतील बंडखोरी आणि त्यानंतर झालेलं सत्तास्थापन अशा नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आत्तापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. आत्तापर्यंत 76 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून कोल्हे परिवाराने माघार घेतल्यानंतर शरद पवारांनी विद्यमान आमदार आशुतोष काळेंच्या विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पवारांनी संदीप वर्पे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संदीप वर्पे यांच्या रुपाने शरद पवारांना अहिल्यानगर जिल्ह्यात अजून एक निलेश लंके सापडले असल्याची ही चर्चा जोरदार कोपरगाव मतदार संघात रंगताना दिसत आहे.


मागील विधानसभा निवडणुकीत संदीप वर्पे यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना निवडून आणण्यासाठी प्रचार केला होता. आता तोच सर्वसामान्य कार्यकर्ता व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तर नगर जिल्हाकार्याध्यक्ष संदीप वर्पे आता आशुतोष काळे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरणार आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी ही लढत पाहायला मिळणार आहे. 


कोण आहेत निलेश लंके?


2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. पारनेर मतदारसंघातून ते विजयी झाले होते. लंके यांनी 12वी नंतर आयटीआय केलं आहे. कोणतीरी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शिवसेनेचे शाखा प्रमुख झाले होते. त्यांनी हंगा गावाची ग्रामपंचायत जिंकली होती. शिवसेनेनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


2019मध्ये त्यांनी आमदारकी मिळवली. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर ते अजित पवारांसोबत गेले होते. मात्र लोकसभेच्या आधीच त्यांनी शरद पवार गटात प्रवेश करत लोकसभेची निवडणूक लढवली. निलेश लंके यांचा विजय झाला आणि ते खासदार झाले.