कोपर्डी, अहमदनगर : भय्यू महाराजांनी कोपर्डीत उभारलेल्या पीडित मुलीच्या स्मारकावरून संभाजी ब्रिगेड आणि छावा संघटना आमने-सामने आलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजी ब्रिगेडनं पीडित मुलीच्या स्मारकाला तीव्र विरोध केलाय. स्मारक न हटवल्यास उद्याचा  कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा भय्यू महाराज यांना दिला गेलाय. 


'पीडित मुलीचे स्मारक म्हणजे अपमान आणि अत्याचाराचं प्रतिक आहे. त्यामुळं पीडित मुलीची स्मारकामुळं बदनामी होईल' असा आरोप संभाजी ब्रिगेडनं केलाय. 


तर छावा संघटनेनं मात्र या कार्यक्रमाच्या समर्थनार्थ भूमिका घेतलीय. स्मारक उभारणं हा कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे. त्यात संभाजी ब्रिगेडनं ढवळा-ढवळ करू नये, अशी टीका छावा संघटनेनं केलीय. त्यामुळं आता उद्याच्या कार्यक्रमात नेमकं काय घडतं याकडे सा-या राज्याचं लक्ष लागलंय. 
  
दरम्यान, कोपर्डीतल्या प्रकरणाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानं पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून वर्षश्राद्धाचं आयोजन करण्यात आलय. त्याचवेळी पीडित मुलीच्या स्मारकाचं अनावरणदेखील यानिमित्तानं होणार आहे. अध्यात्मिक गुरु भैयुजी महाराजांसह अनेक नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. 


त्याचप्रमाणे कोपर्डीतील घटनेनंतर क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींची बैठक गुरुवारी कोपर्डीत होणार आहे. निर्भयाला श्रद्धांजली वाहिल्यानंतर इथल्या नुकत्याच उभारण्यात आलेल्या सभामंडपात ही बैठक होईल. त्यात आंदोलनाची पुढील दिशा तसेच नियोजन या बैठकीत ठरवण्यात येणार आहे....