शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून Whatsapp ग्रूपच्या Adminsला नोटीसा
तब्बल २५० ग्रुप ऍडमिनला पोलिसांकडून तशा नोटीस धाडण्यात आल्या आहेत.
हेमंत चापुडे, झी मिडिया, पुणे: कोरेगाव-भिमा येथे १ जानेवारीला विजयस्तंभावर २०२ वा शौर्यदिवस साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोशल मीडियावर करडी पाळत ठेवण्यात येत आहे. कोरेगाव भिमा, शिक्रापुर, सणसवाडी, पेरणेफाटा लोणीकंद या परिसरातून कुठल्याही पद्धतीने सोशल मिडिया व व्हॉट्सअप ग्रुपवर कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट आली आणि ती पोलिसांच्या निदर्शनास आली तर अशा प्रत्येक ग्रुप ऍडमिनवर थेट गुन्हा दाखल करण्यात येईल.
शिक्रापूर व लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २५० ग्रुप ऍडमिनला पोलिसांकडून तशा नोटीस धाडण्यात आल्या आहेत. तसेच पोलिसांकडून इन्स्टाग्राम, टिकटॉक, हॅलो ऍप आदींसह फेसबुक आणि व्हॉट्सऍपच्या राज्यातील सर्व सोशल मीडिया ग्रुपवर लक्ष ठेवले जात आहे.
मोदी, शहांना शह देण्यासाठी ठाकरे-पवारांची कोरेगाव-भीमा खेळी?
शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १५० ग्रुप व लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १०० ग्रुप ऍडमिनला वैयक्तिकरीत्या नोटिसा बजावण्यात आली आहे.
त्यानुसार हद्दीतील कुठल्याही व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनसह ग्रुपच्या सदस्यांपैकी कुणीही समाजविघातक, ऐतिहासिक विपर्यास, चिथावणी देणारी टीकाटिप्पणी पोस्ट केल्यास सर्वप्रथम ग्रुप ऍडमिनला अटक केली जाईल. यानंतर आयटी कायद्यानुसार कारवाई होईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, शौर्य दिनाच्या दिवशी पोलिसांनी खबरदारी म्हणून १६३ जणांना पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच चार तालुक्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे.