कोरेगाव भीमा, पुणे : १ जानेवारीच्या शौर्यदिनाला यंदा २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे रात्रीपासूनच कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायांनी गर्दी केलीय. भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटमधील माजी सैनिकांनी आज कोरेगाव भीमातल्या विजयस्तंभाला मानवंदना दिली. दरवर्षी हे माजी सैनिक आवर्जून इथे येतात. त्यांनी लष्करी शिस्तीत विजयस्तंभाला मानवंदना दिली. या ठिकाणी मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केलीय. तसंच कोरेगाव भीमा, सणसवाडी वढू बुद्रुक परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. काल रात्री ९ वाजल्यापासून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित केली. मागील वर्षीसारखा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी समाज माध्यमांवरील व्हायरल मेसेजेस रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. 


कोरेगाव भीमामध्ये हजारो अनुयायी दाखल झाले आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी रस्त्यावर भीम सैनिकांची गर्दी उसळली आहे.