पुणे - कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मंगळवारी सकाळपासूनच रिघ लागली आहे. विजयस्तंभाला यंदा २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. यंदा प्रशासन आणि पोलिसांनी परिसरात कडकोट व्यवस्था ठेवल्याने येणाऱ्या नागरिकांना व्यवस्थितपणे अभिवादन करणे शक्य झाले आहे. गेल्यावर्षी झालेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे यावेळी पाच हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंगळवारी सकाळीच भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी विजयस्तंभाला अभिवादन केले. गेल्यावर्षी दंगल घडवणाऱ्यांवर अद्याप सरकारने कारवाई केली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी सोमवारी रात्रीपासूनच परिसरात गर्दी केली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शांतीसेनाही इथे तैनात करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेटसेवा सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूकही बाहेरून वळविण्यात आली असून, विजयस्तंभापासून काही अंतरावर बाहेरून आलेल्या गाड्यांना थांबविण्यात येत आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळविण्यात आली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने खराडी बाह्यवळण मार्गे नगरकडे वळविण्यात आली आहेत. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलने विशेष गाड्या सोडल्या आहेत. त्यातून अनुयायांची ने-आणही केली जात आहे. 


दरवर्षी १ जानेवारीला देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी चळवळीतील संघटनांचे अनुयायी कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी येतात. गेल्यावर्षी काही समाजकंटकांमुळे या ठिकाणी हिंसाचार उसळला होता. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष कोरेगाव भीमाकडे लागले होते. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा पोलिसांनी काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तर काही जणांना दोन जानेवारीपर्यंत जिल्हाबंदी करण्यात आली आहे.