Kurkumbh MIDC Pune Mephedrone Drugs Case: पुण्यामधील ससून रुग्णालयातून चालणाऱ्या अंमली पदार्थांच्या कारखान्यांसंदर्भातील धक्कादायक प्रकरणानंतर आता कुरकुंभमधील ड्रग्ज रॅकेट समोर आलं आहे. पुण्यात ड्रग्ज तस्करीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कारखान्यांवर कारवाई केल्यानंतर थेट ससूनमधून हे कारखाने चालवणाऱ्या ड्रग्ज तस्कर ललित पाटीलसंदर्भातील बरेच धक्कादायक खुलासे समोर आले होते. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता कुरकुंभमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अनिल साबळे या नव्या तस्करासंदर्भात पोलिसांनाही थक्क करणारी माहिती समोर येत आहे. एकेकाळी दुचाकीवर फिरणारा साबळे यंत्रणांच्या हाती लागला तेव्हा तो मर्सिडीजचा मालक असल्याची माहिती समोर आली आहे.


नेमकं हे साबळे प्रकरण काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुरकुंभमध्ये ड्रग्ज रॅकेट ज्या अर्थकम लॅबोरेटरीज कंपनीच्या नावाखाली चालवलं जात होतं त्या कंपनीचा मालक अनिल साबळेच आहे. साबळे हा मुळचा श्रीगोंद्याचा असून साधारणपणे 15 वर्षांपासून त्याची कुरकुंभ एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये साबळे ज्या एमआयडीसीमध्ये परिसरामध्ये दुचाकीवरुन यायचा त्याच ठिकाणी त्याच्यावर कारवाई झाली. मात्र कारवाई झाली तेव्हा एकेकाळी दुचाकीवरुन फिरणारा साबळे मर्सिडीजचा मालक आहे असं समोर आलं आहे. त्याचा गुन्हेगारी विश्वातील हा प्रवास धक्कादायक पण थक्क करणारा आहे. कुरकुंभ एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ए 70, या कंपनीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कंपनीच्या आवारातून पुणे पोलिसांनी तब्बल 1400 कोटी रुपयांचं 700 किलोंचं मेफेड्रॉन नावाचं अंमली पदार्थाचा (एमडीचा ड्रग) साठा जप्त करण्यात आला.


साबळे प्रकरणात हे प्रश्न अजून अनुत्तरितच


20 फेब्रुवारी रोजी साबळेच्या कंपनीतील हा प्रकार उघडकीस आला. 13 तास पुणे पोलिसांची ही कारवाई चालली. साबळेचे कोणाकोणाशी संबंध आहे.  त्यातून साबळेने गुन्हेगारी मार्गाने किती संपत्ती जमा केली? या उद्योगात साबळेचे इतर कोण साथीदार आहेत? साबळेवर कोणाचा वरदहस्त आहे? ललित पाटीलवरील कारवाईनंतरही साबळेनं मेफेड्रॉन निर्मिती कशी सुरु ठेवली? या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत आहेत, असं पोलिसांच्या सूत्रांनी सांगितलं आहे.


ड्रग्ज निर्मितीचं केंद्र ठरतेय कुरकुंभ एमआयडीसी


कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अशाप्रकारे ड्रग्ज निर्मिती होत असल्याची ही तिसरी घटना आहे. साबळेच्या अर्थकम कंपनीवरील कारवाईपूर्वी याच ठिकाणी भागात असलेल्या समर्थ लॅबोरेटरीज आणि सुजलाम केमिकल्स नावाच्या कंपन्यांवरही पोलिसांनी कारवाई केली होती. या कंपन्यांमध्येही मोठा ड्रग्जसाठा सापडला होता. कारवाईनंतर समर्थ लॅबोरेटरीज आणि सुजलाम केमिकल्स या कंपन्यांमध्ये पुन्हा काम सुरु झालं असलं तरी तिथे नेमकं कसलं उत्पादन केलं जात याची माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भातील तपास करण्याची मागणीही आता साबळे प्रकरणानंतर केली जात आहे. कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये अशा अनेक संदिग्ध कंपन्या आहेत जिथे नेमकं कसं उत्पादन घेतलं जातं याची माहिती कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील फलकावर देण्यात आलेली नाही. या कंपन्या केमिकल कंपन्यांच्या नावाखाली भलतेच उत्पादन घेत असल्याची चर्चा आहे.


दिल्लीतही पुणे पोलिसांची कारवाई


कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्यांमधील ड्रग्ज थेट दिल्लीत विक्रीसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांनी दिल्लीत केलेल्या कारवाईमध्ये 1200 कोटींचे ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले आहेत. 3 दिवसांमध्ये पुणे पोलिसांनी 4000 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा पुणे पोलिसांनी जप्त केला आहे.