CCTV Footage Video Kurla BEST Bus Accident: बृहृन्मुंबई इलेक्ट्रीसिटी सप्लाय अॅण्ड ट्रान्सपोर्ट म्हणजेच 'बेस्ट'च्या बसला मुंबईतील कुर्ल्यात भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एस. जी. बर्वे मार्गावर भरधाव बसने अनेक वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 4 जण दगावले असून 25 जण जखमी झाले आहेत. सदर अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघातग्रस्त बसने कशाप्रकारे वाहनांना काही फुटांपर्यंत फरफटत नेलं हे दिसत आहे. 


सीसीटीव्हीमध्ये काय दिसत आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेलं सीसीटीव्ही फुटेज हे एका बसस्थानकामागील अस्थापनांसमोर लावलेल्या कॅमेरात रेकॉर्ड झालं आहे. या व्हिडीओमध्ये अपघात रात्री 9 वाजून 36 मिनिटांनी झाल्याचं कॅमेरातील तपशीलामध्ये दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सामान्यपणे वरदळ असते तशी गर्दी बस स्टॉप आणि रस्त्यावर दिसत आहे. अचानक या रस्त्यावरुन भरधाव वेगाने एक बस जाताना दिसते. या बसच्या पुढे एक आडवी रिक्षा असून बस या रिक्षाला धडक देऊन तिला फरफटत नेताना दिसत आहे. बस रिक्षाला धडक देऊन फरफटत घेऊन जात असल्याचं पाहून स्थानिकांनी या बसच्या मागे धावत पाठलाग सुरु केल्याचं दिसत आहे. 


पोलिसांचं म्हणणं काय?


या अपघातासंदर्भात झोन 5 चे उपायुक्त गणेश गावडे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सविस्तर तपशील दिला. "कुर्ल्यामध्ये बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने काही वाहने चिरडली. 25 लोक यामध्ये जखमी झाले असून मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे. जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणामध्ये बस चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणाचा तपास आम्ही करत आहोत," अशी माहिती गावडे यांनी दिली. बसचा वेग इतका होता की ती समोर फरफटत घेऊन गेलेली वाहने एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या संरक्षण भिंतीला धडकल्यानंतरच थांबली. त्यानंतरही या बस भोवती मोठी गर्दी झाली. बसमधील प्रवाशांनी आपत्कालीन खिडकी फोडून बाहेर काढण्यात आलं. 



ड्रायव्हरला मारहाण करण्याचा प्रयत्न


जखमींना महानगरपालिकेच्या भाभा रुग्णालयाबरोबरच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाभा रुग्णालयातील डॉक्टर पद्मश्री आहिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यापैकी दोघांना दाखल केलं तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर या बेस्ट बसच्या चालकाला काही लोक सुरक्षित स्थळी घेऊन जात असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. काहीजण या बस चालकाला शिव्या देत होते. तर काहीजण त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसले. त्याला मारु नका, असं सांगताना लोक या व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.