Mukhyamantri Annapurna Scheme 2024: लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे. या योजनेचा कोणा कोणाला लाभ घेता येणार तसंच काय असतील अटी शर्थी याची सविस्तर माहिती जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधीमंडळात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंकापाचा सिलिंडर देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ५२ लाख १६ हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसंच लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. 


राज्यातील उज्ज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. या योजनेसाठी एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल. हा लाभ 14.2 किलो ग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गंत द्यायच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. 


काय आहेत अटी


- महिलांच्या नावे गॅस जोडणी असणा-या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार


- एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार. 


- एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत


- 1 जुलै 2024 नंतर विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत. 


बँक खात्यात रक्कम येणार 


उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान देते. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतंर्गत 
राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखी 530 रुपये जमा करेल. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रतिसिलिंडर 830 रुपये जमा करणार आहे.