Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये सध्या लाडकी बहिण योजनेची बरीच चर्चा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य असलेल्या मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री लाडली बहना योजना' योजनेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेली ही योजना राज्यातील शिंदे सरकारला नवसंजीवनी देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये उपस्थित केला जात आहे. ही योजना शिंदे सरकारसाठी हुकूमी एक्का ठरणार का? यावरच टाकलेली ही नजर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय मंत्री शिवाराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेश सरकारने 'मुख्यमंत्री लाडली बहना योजना' योजनेची सुरुवात केली होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना सुरु केली असल्याने, सरकारला जसा मध्य प्रदेशमध्ये फायदा झाला, तसा महाराष्ट्रात होईल का? याबद्दल चर्चा सुरु असतानाच ही योजना नेमकी काय आहे हे आधी पाहूयात...


महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना काय?


महाराष्ट्रातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये देण्याच्या या योजनेसाठी 1 जुलै 2024 पासून महिलांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवातही झाली आहे. योजनेसाठी नावनोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.


या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला 18 हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ही योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही, यादृष्टीने चोख नियोजन करावे, लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


लाडकी बहिण योजनेत करण्यात आले बदल


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेत काही महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेत. अदिती तटकरेंनी सभागृहात योजनेबाबतची माहिती दिली. आता ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशनकार्ड असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे एखाद्या परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्राचा रहिवाशी असलेल्या पुरुषाशी विवाह झाल्यास ती महिलाही या योजनेची लाभार्थी ठरणार आहे.


नक्की वाचा >> मोबाईलवरुन कसा घेता येईल लाडकी बहिण योजनेचा लाभ; अ‍ॅप बद्दल जाणून घ्या A टू Z


महाराष्ट्रात सुरु झालेल्या या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे मुद्दे...


-31 ऑगस्ट 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार


-ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान मिळणार


-आदिवास प्रमाणपत्राची अट शिथील करण्यात आली.


-15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला यापैकी एक पुरावा पुरेसा आहे.


-5 एकर शेतीची अट वगळण्यात आली.


- 21 ते 65 वयोगटातील प्रत्येकी एका कुटुंबातील अविवाहित महिलेला योजनेचा लाभ घेता येणार.


-परराज्यातील स्त्रीचा महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झाल्यास त्या महिलेला योजनेचा लाभ घेता येणार.


- पिवळं आणि केशरी रेशनकार्डधारकांना योजनेत खास सूट देण्यात आली आहे.


नक्की वाचा >> मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही


मध्य प्रदेशातील योजना काय आहे?


- मध्य प्रदेशमध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांसाठी ही योजना आहे.


-  28 जनेवारी 2023 रोजी सुरु करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला आधी 1 हजार रुपये देण्यात आले. त्यानंतर यामध्ये वाढ करुन ही रक्कम 1250 रुपये करण्यात आली.


- मार्च 2023 पासून या योजनेमध्ये मध्य प्रदेश सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांचं आरोग्य आणि पोषक आहारातील सुधारणेसाठी कुटुंबातील स्थिती अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने दर महिना 1250 रुपये देण्यास सुरुवात केली.


- मध्य प्रदेशमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी करणाऱ्या महिलांना ही रक्कम दर महिन्याच्या 10 तारखेला दिली जाते. आधी या योजनेत महिना 1000 रुपये दिले जायचे. ज्यामध्ये नंतर 250 रुपयांनी वाढ करण्यात आली. म्हणजेच दर वर्षी प्रत्येक महिलेला 15000 रुपये निधी दिला जातो.


मध्य प्रदेशात कसा फायदा झाला?


2023 च्या निवडणुकीत मध्य प्रदेशात भाजपला मोठं यश मिळालं. तब्बल 165 जागा जिंकून भाजप पुन्हा सत्तेत आलं. त्या पाठोपाठ झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं सर्वच्या सर्व 29 जागा जिंकल्या आहेत. 


नक्की वाचा >> Majhi Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेला मुदतवाढ! आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज


अजित पवारांना जयंत पाटलांचा टोला


'मध्य प्रदेशात ही योजना सुरु केल्यानंतर शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून अजितदादांना ही योजना मांडायला सांगितली', असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी काढला आहे.