अहमदनगर : तारकपूर एसटी आगारातल्या वर्क शॉपमध्ये एसटी बस दुरुस्त करणाऱ्या वर्षा गाढवे या महिला, इतरांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरल्या आहेत. आयुष्यातील खडतर परिस्थितीवर मात करुन, वर्षा गाढवे यांनी आधी रिक्षा चालिका म्हणून काम केलं. त्यानंतर प्राथमिक शिक्षिका आणि आता मोटार मेकॅनिक असा वर्षा यांचा आतापर्यंतचा प्रवास राहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातली गरीबी आणि हलाखीच्या परिस्थितीवर मात करत, वर्षा यांनी डी एडपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. मात्र खासगी शाळेत पगार कमी असल्यानं घराला आर्थिक हातभार  लावण्यासाठी त्यांनी रिक्षाही चालवली. लग्नानंतर परभणीहून त्या औरंगाबादला आल्या. आणि पतीच्या प्रेरणेनं त्यांनी मोटार मेकॅनिक हा आयटीआयचा कोर्स पूर्ण केला. 


एसटी बस दुरुस्तीचे काम करणाऱ्या त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. इतर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या जिद्दीनं आणि निष्ठेनं आपलं काम करत आहेत.