मुकुल कुलकर्णी, झी मीडिया नाशिक : नाशिकमधे बुरखाधारी महिला गँगची दहशत पसरलीय,सराफा व्यावसायिक, मोबाईल दुकानदार, इलेक्ट्रॉनिक उपकरण विक्रेते आशा सगळ्यांनीच या गॅंगचा धसका घेतलाय. कधी कोणाला लाखो रुपयांचा गंडा घालतील याचा काहीच नेम नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या या बुरखाधारी महिला अट्टल चोर आहेत. दुकानात प्रवेश करून सेल्समनला बोलण्यात गुंतवतात आणि लाखो रुपयांचा माल हातोहात लंपास करतात. तीन दिवसांपूर्वी या बुरखाधारी गॅंगने नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील एक सराफा दुकानात घुसून लाखो रुपयांचे कमी वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. 


दागिने भरलेले दोन बॉक्स या महिलांनी लांबवले. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोबाईल शॉप मधून हातचलाखीने 42 हजार रुपयांचे दोन मोबाईल लंपास केलेत. सततच्या चोरीच्या घटनेनं व्यासायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.  


एकांतातील नाही तर गर्दीच्या ठिकाणी असणारी मोठं मोठी दुकाने या बुरखाधारी महिला हेरतात. लहान मुलांना बरोबर ठेवून मुलांशी खेळता खेळता गोंधळ घालतात. समोरच्याच लक्ष विचलित करतात आणि त्यांनतर दणका देतात. आतापर्यंत चार ते पाच दुकानदार या बुरखाधारी महिला गॅंगचे शिकार झालेत.


मागच्या महिन्यात भिकारी बनून लहान मुलांना कड्यावर नेऊन दुकानदारांना लुटणारी टोळी सक्रिय झाली होती, त्यांचा बुरखा फटण्याच्या आधीच बुरखाधारी गँग सक्रिय झालीय, पोलीस दलाच्या नाकावर टिचून शहरात एका पाठोपाठ एक चोरीचे सत्र सुरू असून पोलिस केवळ सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात दंग आहेत.