विशाल करोळे, झी २४ तास, औरंगाबाद : जमिनीच्या नोंदणीसाठी सातबाराचा उतारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज...मात्र आता हा सातबारा कालबाह्य होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्डचा आधार मालकी ठरवण्यासाठी होणार आहे. नेमका काय निर्णय झालाय, बघुयात...जमिनीची मालकी ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सातबाराचा उतारा आता बंद होणार आहे. शहरी भागांमध्ये शेतजमीन शिल्लक राहिली नसल्यानं सातबाराची गरज राहिली नसल्यामुळे राज्य सरकारनं हा निर्णय घेतलाय. त्यामुळे केवळ शहरांसाठीच हा निर्णय लागू असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ज्या राज्यात सिटी सर्व्हे झाले आहेत, तिथं प्रॉपर्टी कार्ड दिली गेली आहेत. 
अशा शहरांमध्ये सातबारा उतारा बंद करण्यात येणार आहे. 
सुरूवातीला प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी याची अंमलबजावणी सुरू झालीये. 
पुण्यातील हवेली तालुका, सांगली, मिरज, नाशिक इथं ही पद्धत राबवण्यात येईल. 
हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यभरात त्याची अंमलबजावणी केली जाईल. 


सातबारा उता-यात फेरफार करून फसवणूकीची शक्यता असते. सिटी सर्व्हे झालाय पण सातबारा नाही, अशाही काही जमिनी आहेत. त्यामुळे घोळ होतो आणि खटले भरले जातात. त्यामुळे शेतीसाठी वापर होत नसलेल्या जमिनींचा सातबारा बंद करण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागानं सुरू केलीये. 


अर्थात, केवळ शहरी भागातील शेती होत नसलेल्या जमिनींसाठी सध्या ही पद्धत असेल. शेतजमीन असेल, तर त्यासाठी सातबाराचीच पद्धत कायम राहणार आहे.