अमरावती : 36 तासांचा विकेंड लॉकडाऊन संपल्यानंतर अमरावती शहर आज सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा अनलॉक झाला आहे. परंतु आज रात्री आठ वाजता शहर पुन्हा लॉक डाऊन होणार असल्याने नागरिक सर्वच खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करतांना दिसत आहे. दारूच्या दुकानासमोरही नागरिकांनी दारू घेण्यासाठी रांगा लावल्या चित्र पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीत आज रात्री 8 पासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे अमरावतीतून बाहेर जाण्यासाठी बस स्थानकात मोठी गर्दी झाली आहे. नागरिकांनी कोरोनाचे नियम अक्षरश: धाब्यावर बसवलेत. लोक बेफिकीरपणे विना मास्क फिरताना दिसत आहेत.


अमरावतीत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी मॉल समोर रांगा लावल्या आहेत. अमरावती शहर आणि अचलपूर शहरात आज संध्याकाळपासून सात दिवसांचा मोठा लॉक डाऊन लागणारेय. या लॉक डाऊनच्या काळात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे. तरीही सात दिवसाच्या लॉक डाऊनमध्ये गैरसोय होऊ नये यासाठी नागरिकांनी जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली. अमरावतीच्या अशाच एका मॉलमध्ये आज पहाटेपासूनच ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.



अमरावती शहरामध्ये आता सात दिवसांच्या कडक लॉकडाउनची घोषणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे. त्यानुसार आज रात्री आठ वाजता पासून अमरावती आणि अचलपूर शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सात दिवस कडेकोट लॉकडाऊन पाळला जाणार आहे. दरम्यान कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता यापूर्वीच 36 तासांचा विकेंड लॉकडाऊन अमरावती जिल्ह्यात घेण्यात आला. त्यामुळे काल अमरावतीही निर्मनुष्य झाली होती. सुनसान रस्ते काल अंबानगरीत पाहायला मिळाले होते. आज रात्री आठपासून पुन्हा एकदा सात दिवसांसाठी अमरावती लॉक होणारेय. त्यामुळे 12 तासांच्या अनलॉकमध्ये लोक अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड पहायला मिळते आहे.